रत्नागिरी : शहराला नैसर्गिक उताराने पाणीपुरवठा करणाऱ्या पानवल धरणाचे ६० वर्षांनंतर मजबुतीकरण होणार आहे. विधानसभेच्या आचारसंहितेमध्ये हे काम रेंगाळले होते. त्याची निविदा प्रक्रिया लवकरच होणार आहे. त्यामुळे २० कोटींच्या कामाच्या प्रक्रियेला वेग आला आहे. औद्योगिक विकास महामंडळाने त्यासाठी निधी दिला आहे. रत्नागिरी पालिका मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी याला दुजोरा दिला.
रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे पानवल धरण १९६५ बांधण्यात आले. शहराला प्रामुख्याने पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी हे एक आहे. शीळ, पानवल धरण व नाचणे तलाव या तीन जलस्रोतांतून पाणीपुरवठा होतो. यापैकी पानवल धरणातील पाणीसाठा दरवर्षी फेब्रुवारीअखेरीस संपुष्टात येतो. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. त्यानंतर शीळ धरणावर वाढत्या रत्नागिरी शहराच्या पाणीपुरवठ्याची भिस्त असते. पावसाळा सुरू होईपर्यंत शहराला पाणीपुरवठा करण्याची मोठी कसरत पालिका प्रशासनाला करावी लागते. सुधारित पाणीपुरवठा योजनेमुळे गळती कमी झाल्याने ताण कमी झाला आहे; परंतु शीळ धरणातील पाण्याच्या मर्यादित साठ्यामुळे पालिकेला पाणीपुरवठ्याची मोठी चिंता आहे.
पानवल धरण शहरापासून सुमारे १६ कि.मी. अंतरावर आहे. हे धरण १९५२ मध्ये मंजूर झाले. १९६५ मध्ये धरणाचे काम पूर्ण झाले होते. विजेसाठी एकही रुपया खर्च न करता केवळ नैसर्गिक उताराच्या आधाराने शहराला पाणीपुरवठा करणारे पानवल हे एकमेव धरण आहे. येथील पाणी नैसर्गिक उताराच्या आधाराने नाचणे येथील जलशुद्धीकरण केंद्रात येते. शुद्धीकरण करून ते शहरवासीयांना पुरवले जाते; मात्र या धरणातून शहराची पूर्ण गरज भागत नाही, परंतु काही महिने विनाखर्च शहराला पाणीपुरवठा करणारे हे धरण खूप उपयोगी मानले जाते. या धरणाची ५१८ द.ल.घ.मी पाणीसाठा करण्याची क्षमता आहे. या पाण्याचा वापर शहरवासीयांसाठी पाच ते सहा महिने केला जातो. त्या कालावधीत शीळ धरणातून पाण्याची उचल कमी प्रमाणात केली जाते. त्यामुळे पालिकेला वीज बिलात मोठी कपात होते, परंतु आता पानवल धरणाला ४० ते ५० टक्के गळती लागली आहे. त्यामुळे त्याची दुरुस्ती होणे, गाळ काढून साठवण क्षमता वाढवणे काळाची गरज आहे. या धरणाच्या मजबुतीकरणासाठी पालिकेने जलसंपदा विभागाला २० कोटींचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव मंजूर झाला. पालिकेने याची निविदा प्रक्रिया सुरू केली; परंतु विधानसभा आचारसंहिता आल्यामुळे ही प्रक्रिया रखडली होती. आचारसंहिता संपल्यामुळे लवकरच निविदा प्रक्रिया करून ठेकेदार निश्चित केला जाणार आहे. त्यानंतर लवकरात लवकर धरणाच्या दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.
पानवल धरणाच्या मजबुतीकरणासाठी २० कोटींचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने मंजूर केला आहे. त्यासाठी एमआयडीसीकडून निधी मिळाला आहे. आचारसंहिता संपल्यामुळे लवकरच निविदा प्रक्रिया केली जाणार आहे. तुषार बाबर, मुख्याधिकारी रत्नागिरी पालिका
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 PM 26/Nov/2024














