रत्नागिरी नगर वाचनालय इमारतीच्या पुनर्बांधणीच्या कामाला प्रारंभ

रत्नागिरी : रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या इमारतीला नवा साज देण्याचे काम सुरू आहे.

सध्या पुनर्बांधणीचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली. सध्या जुनी इमारत पाडण्याचे काम सुरू झाले आहे. नवीन बांधकाम डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून करण्याचे नियोजन आहे. या दुमजली बांधकामासाठी ३ कोटीचे अंदाजपत्रक तयार केले असून, त्यापैकी १ कोटीची रक्कम आजपर्यंत जमा करण्यात आली आहे. उर्वरित दोन कोटी उभे करण्याचे काम सुरू आहे, असे अॅड. पटवर्धन यांनी सांगितले.

रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय ही रत्नागिरीतील सर्वात जुनी संस्था आहे. ज्या शहरातील वाचनालय गजबजलेले ते शहर सुसंस्कृत म्हणून गणले जात होते. तो वसा आजही रत्नागिरीत पाळला जात आहे. ग्रंथसंपदेने समृद्ध हे वाचनालय आजही सुजाण वाचकांनी गजबजलेले असते. वाचनसंस्कृती जपतानाच गेल्या २५ वर्षांत २५० विविध साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रम वाचनालयाने रत्नागिरीकरांसाठी आयोजित केले. एक लाख १५ हजारांची ग्रंथसंपदा संकलित करत दुर्मिळ पुस्तकांचे माहेरघर म्हणून आपली ओळख वाचनालयाने सर्वदूर पोहोचवली आहे. बहुआयामी उपक्रम ज्या वास्तूमध्ये होत होते ती वास्तू जुनी झाली. त्यामुळे ही वास्तू पाडून तिथे नवीन वास्तू उभी राहणार आहे. वाचनालयाची जागा शासनाकडून लीज अॅग्रीमेंटने २०४८ पर्यंत १ रुपया प्रति चौ. मी. दराने प्राप्त करण्यात प्रदीर्घ प्रयत्नानंतर यश प्राप्त झाले. लगेच बांधकाम परवानगीही मिळाली. त्यानुसार ११ हजार ५०० चौरस फुटाचे बांधकाम करण्यासाठी नियोजन सुरू आहे. या वाचनालयास २०२८च्या जानेवारीमध्ये २०० वर्ष पूर्ण करताना वाचनालयाची नवी वास्तू परिपूर्णपणे उभी राहावी यासाठी भरीव आर्थिक योगदानाची आवश्यकता आहे.

पुढील विचार करुन वास्तूची उभारणी
वाचनालयाची इमारत उभी करण्यासाठी आर्थिक मदत विविध स्तरावरून गोळा केली जात आहे. त्यासाठी देणगीदारांची नावे वाचनालयाच्या कक्षाला किंवा स्वतंत्र विभागालाही दिली जाणार आहेत. सरस्वतीचे ग्रंथमंदिर उभे करण्यासाठी मदतीचा हाथ मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वाचनालयाची पुढील १०० वर्षांची वाटचाल दिमाखदार होण्यासाठी ही नवीन वास्तू उभी करणे आवश्यक आहे. त्या नवनिर्मितीसाठी बहुमोल आर्थिक योगदान अत्यावश्यक आहे, असे अॅड. पटवर्धन यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:18 26-11-2024