राजापूर : राजापूर विधानसभा मतदारसंघातून दणदणीत विजय संपादन केल्यानंतर या मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी सर्वांना समवेत घेऊन या मतदारसंघाचा रखडलेला विकास मार्गी लावणे हा आपला महत्त्वपूर्ण उद्देश असून, त्यासाठी विकास आराखडा तयार करू, अशी ग्वाही दिली आहे. याशिवाय राजापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची भक्कम संघटना बांधणी करणे यावर देखील त्यांनी अधिक भर दिला आहे.
मागील काही वर्षात राजापूर, लांजा, साखरपा या मतदार संघाची झालेली पिछेहाट पाहूनच आपण येथून विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्याला मतदारांनी दिलेला प्रतिसाद पाहाता आता जनतेच्या मनातील स्वप्नपूर्ती करण्यासाठी पण प्रयत्नशील व बांधील आहे, अशी भूमिका नवनिर्वाचित आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी व्यक्त केली आहे. राजापूर-लांजा-संगमेश्वर मतदार संघातील सर्वसामान्य जनतेला विकासाची आस होती मात्र भावनिक राजकारणात ती पूर्ण होत नव्हती. त्यातून नाहक गैरसमज पसरविण्याचे प्रयत्नदेखील झाले. त्यामुळे विकास तर अधिकच दूर निघून गेला. परिणामी, हा मतदारसंघ अविकसित राहिला अशी भावना आमदार किरण सामंत यांनी व्यक्त केली. महायुतीतील घटक पक्षांना सोबत घेऊन आपण सरकार स्थापनेनंतर मतदारसंघातील मागासलेपणाचा फेरआढावा घेऊन कामाला सुरुवात करणार असल्याची ग्वाही सामंत यांनी दिली. मतदारसंघातील महायुतीच्या अनेक पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी आपल्या विजयासाठी अपार मेहनत घेतली आहे. त्यांना धन्यवाद देत असताना मतदार संघातील गेल्या अनेक वर्षातील निगेटिव्ह भावना संपुष्टात आणण्यासाठी कार्यक्रम आखण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
राजापूरला गतवैभव मिळवून देणार
राजापूरचे गतवैभव पुन्हा येण्यासाठी येथील स्थलांतर रोखणे आवश्यक आहे. ते रोखण्यासाठी येथील पायाभूत सुविधांकडे लक्ष पुरवावे लागेल असे सांगताना विधानसभा मतदारसंघाचा विकास आराखडा तयार करून अविकसित राहिलेल्या या मतदारसंघाला विकसित करण्यासाठी आपले परिपूर्ण प्रयत्न राहतील. अशा शब्दात राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार किरण सामंत आपल्या भावना व्यक्त केल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:56 PM 26/Nov/2024














