खेडमध्ये बंधारे बांधण्याचा मुहूर्त हुकला

खेड : तालुक्याला भेडसावणारी पाणीटंचाईची तीव्रता कमी करून टँकरने होणाऱ्या पाणीपुरवठ्याची प्रक्रिया लांबणीवर टाकण्यासाठी दरवर्षी विजय बंधारे बांधण्याची मोहीम पंचायत समिती स्तरावर हाती घेण्यात येते; मात्र यंदा विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत प्रशासकीय यंत्रणा गुंतल्यामुळे बंधारे बांधण्याचा मुहूर्त हुकलेला आहे.

बंधारे बांधण्याची प्रक्रिया लांबणीवर पडल्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे. उर्वरित कालावधीत प्रशासकीय पातळीवरून विजय बंधारे बांधण्यासाठी कोणती पावले उचलली जातात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागलेले आहे. तालुक्याला दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्याच्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवरून ठोस उपाययोजनांचा अवलंब केला जात असला तरीही पाणीटंचाई तालुक्याच्या पाचवीलाच पुजल्यासारखी आहे. त्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता कमी करून ग्रामस्थांना काहीअंशी दिलासा देण्याकरिता विजयी बंधारे बांधण्यावर भर दिला जातो. या बंधाऱ्यांमुळे मुबलक पाणीसाठा निर्माण होऊन पाणीटंचाई लांबणीवर पडते. गतवर्षी जवळपास २१३ विजयी बंधारे बांधण्यात आले होते. या बंधाऱ्यांमुळे टँकरने पाणीपुरवठा करण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली होती. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात विजयी बंधारे बांधण्याची प्रक्रिया पूर्ण होते. यंदा या प्रक्रियेत विधानसभा निवडणुकीमुळे खोडा पडला आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणा विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत गुंतल्याने अद्यापही विजयी बंधारे बांधण्यास मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे यंदा पाणीटंचाई ग्रामस्थांना रडकुंडीस आणण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेनंतर बंधाऱ्याच्या प्रक्रियेस गती येणे गरजेचे आहे.

पहिला मान देवघर-सोंडे ग्रामपंचायतीला
तालुक्यात विजयी बंधारे बांधण्याचा मुहूर्त लांबणीवर पडला असला तरीही देवघर-सोंडे ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत गावातील नदीवर विजय बंधारा बांधत पहिला मान मिळवला आहे. ग्रामस्थांच्या सहभागातून बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे नदीपात्रात मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाल्याने पाणीटंचाईची समस्या लांबणीवर पडणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:08 PM 26/Nov/2024