रत्नागिरी : आर्ट सर्कल रत्नागिरीच्या वतीने दरवर्षी साकारणारा शास्त्रीय संगीत महोत्सव दि. २४,२५ आणि २६ जानेवारी २०२५ या तीन दिवसांमध्ये होणार आहे.
दि. २४ जानेवारी रोजी बंगलोरचे सुप्रसिद्ध गायक सिद्धार्थ बेलामनु महोत्सवाचा प्रारंभ करणार आहेत. उडूपी येथे जन्मलेल्या सिद्धार्थ यांना त्यांच्या आई- वडिलांकडून वारसा हक्काने संगीत मिळाले आहे. प्रारंभी कर्नाटक शास्त्रीय संगीत आणि त्यानंतर गुरू पी. आर. मंजूनाथ यांच्याकडे उत्तर भारतीय शास्त्रीय संगीताचे धडे घेत सिद्धार्थ यांनी आपल्या गाण्याला आकार दिला. ग्वाल्हेर आणि किराणा घराण्याचे अध्वर्यू पं. विनायक तोरवेजींकडे गेली आठ वर्षं गुरुकुल पद्धतीने शिकत सिद्धार्थ पुढील प्रगती करत आहेत. रत्नागिरीचा वरद सोहनी सिद्धार्थ यांना संवादिनी साथ करणार आहे, तर प्रणव गुरव तबला साथ करणार आहे.
उद्घाटनाच्या दिवशी रात्री साडे आठ वाजता पं योगेश समसी यांचा तबला सोलो होणार आहे. वडील पं. दिनकर कैकिणी यांच्याकडून वयाच्या चौथ्या वर्षीपासून तबल्याचे धडे घ्यायला त्यांनी सुरूवात केली. पं एच. तारानाथ राव यांच्याकडून पुढील धडे घेतल्यानंतर साक्षात ताल मानले जाणारे उस्ताद अल्लारखाँ यांच्या मार्गदर्शनाखाली तबल्यावर प्रभुत्व मिळवायला सुरूवात केली. भारतातील जवळजवळ सर्वच श्रेष्ठ आणि ज्येष्ठ कलाकारांना तबला संगत केली आहे. उत्तम संगतकार आणि उत्तम एकल वादक असा दुर्मिळ संयोग संगीत महोत्सवात योगेशजींच्या निमित्ताने रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. त्यांच्यासोबत पुण्याचे मिलिंद कुलकर्णी संवादिनीवर लेहरासाथ करणार आहेत.
दि. २५ जानेवारी रोजी सायंकाळी ७.०० सुप्रसिद्ध युवा व्हायोलिन वादक यज्ञेश रायकर आणि बासरीवादक एस. आकाश आपल्या सहवादनाने प्रारंभ करतील. वडील जगप्रसिद्ध व्हायोलिन स्वरप्राज्ञ पं. वादक मिलिंद रायकर यांच्या तालमीत तयार झालेले यज्ञेश यांनी वयाच्या चौथ्या वर्षी ६०० संगीतप्रेमी आणि जाणकारांसमोर पहिले सादरीकरण केले होते. गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचेही मार्गदर्शन यज्ञेश यांना लाभले आहे. आनंद पेडणेकर आणि कै. पं. वसंतराव कडणेकर यांच्याकडून कंठसंगीताचेही धडे त्यांनी घेतले आहेत. या तंतूवाद्यासोबत सहवादन आहे सुषीर वाद्य बासरीचे! संकेथी घराण्यात जन्मलेले आणि संगीतप्रेमी पालक वडील एम. एन. सतीश कुमार आणि श्रीमती वाणी सतीश यांच्याकडून प्रेरणा घेत बासरी वादक एस. आकाश घडत गेले. वयाच्या चौथ्या वर्षी सुप्रसिद्ध बासरीवादक पं व्यंकटेश गोडखिंडी यांच्याकडे बासरीचे धडे गिरवायला त्यांनी सुरूवात केली. पं. रोणू मुझुमदार यांचे शिष्यत्व पत्करल्यानंतर त्यांचे वादन अधिकाधिक बहरत गेले आहे. या सहवादनाला पखवाजसाथ करणार आहेत रत्नागिरीचे गुणी वादक प्रथमेश तारळकर. तालयोगी पं सुरेश तळवलकर यांच्या तालमीत तयार होत प्रथमेश यांनी अल्पावधीतच स्वतःचे भक्कम स्थान संगीत जगतामध्ये निर्माण केले आहे. या सहवादनाला तबला साथ करणार आहेत, विवेक पंड्या.
महोत्सवाच्या दुसर्या दिवसाचा समारोप करतील, बंगलोरच्या शास्त्रीय गायिका विदुषी भारती प्रताप. आग्रा घराण्याच्या भारती प्रताप आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या मान्यताप्राप्त कलाकार आहेत. कर्नाटक शास्त्रीय संगीताचे धडे गिरवत असताना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या ओढीने त्यांनी त्याही पद्धतीचे शिक्षण घेण्यास सुरूवात केली. गुरु श्री. मारुतीराव इनामदार, पं. रामाराव व्ही. नाईक यांच्याकडे मार्गदर्शन घेतल्यावर गेला काही काळ आग्रा घराण्याच्या अध्वर्यू विदुषी ललित जे. यांच्याकडे शिक्षण सुरू आहे. मानाच्या सर्व महोत्सवामध्ये सादरीकरण केलेल्या विदुषी भारती यांना पं. अजय जोगळेकर संवादिनी साथ तर बेंगलोरचे योगीश भट तबला साथ करणार आहेत.
महोत्सवाचा समारोप दिवसाची सुरूवात दि. २६ रोजी ७.०० वाजता संतूर वादक डॉ. शंतनु गोखले करणार आहेत. कोवळ्या वयात तबला आणि संवादिनीचे मार्गदर्शन घेण्यास सुरूवात केली आणि कळत्या वयात मात्र त्यांना भुरळ घातली ती संतूर या वाद्याने. पं शिवकुमार शर्मा यांचेकडे शिकण्याचे भाग्य त्यांना लाभले. त्यांना दिल्लीचे सुप्रसिद्ध तबला वादक यशवंत वैष्णव साथ संगत करणार आहेत.
महोत्सवाचा समारोप करणार आहेत, हुबळीचे सुप्रसिद्ध गायक पं. जयतीर्थ मेऊंडी. एक दशकाहून अधिक काळ त्यांनी पं अर्जुनसा नाकोद यांच्याकडे गाण्याची तालीम घेतली. त्यानंतर भारतरत्न पं. भीमसेन जोशींचे शिष्य पं. श्रीपती पडिगर यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. पं. भीमसेन जोशी यांच्या गायकीची आठवण करून देणार्या गायकीने महोत्सवाचा हृद्य समारोप होणार आहे. त्यांना यशवंत वैष्णव तबला साथ तर अजय जोगळेकर संवादिनीसाथ करणार आहेत.
दरवर्षीप्रमाणे याही महोत्सवाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आर्ट सर्कल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 27-11-2024