मूलभूत हक्कांबरोबर कर्तव्याचेही पालन करा : न्यायमूर्ती एम. ए. शिंदे

मंडणगड : संविधानात दिलेल्या ‘भारतीय मूलभूत हक्कांबरोबर मूलभूत कर्तव्यांच्या जबाबदारीचे पालन प्रत्येक नागरिकाने केले पाहिजे. शाळांमध्ये संविधानाचे बीज विद्यार्थ्यांच्या अंगी बिंबवून त्यांना भविष्याच्यादृष्टीने संस्कारित घडवण्याचे कार्य करणे हे देशाच्या उन्नती व प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे,’ असे प्रतिपादन मंडणगड न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. ए. शिंदे यांनी केले.

मंडणगड येथे संविधान सन्मान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पंचायत समिती मंडणगड शिक्षण विभागाच्या वतीने भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल मंडणगड ते तहसील कार्यालय भिंगळोली अशी तीन हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत संविधान सन्मान रॅली काढण्यात आली.

या रॅलीत महापुरुषांच्या वेशभूषा धारण केलेले विद्यार्थी व संविधानाविषयी जागृती करणारे फलक लक्षवेधी ठरले.

संविधान रॅलीत विद्यार्थी, शिक्षक, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. त्यानंतर पंचायत समितीत जिजामाता सभागृहात झालेल्या कार्यक्रमात आयएसओ शाळा शेनाळे येथील विद्यार्थ्यांनी संविधान गीत सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना न्यायमूर्ती शिंदे यांनी संविधान दिनाचे महत्त्व सांगितले. त्यांनी स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधूता या मूलतत्त्वांवर आधारित संविधानाच्या आधारे देशाची न्यायिक व्यवस्थेची कार्यपद्धती व त्यातील नागरिकांचे मूलभूत हक्क, अधिकार विविध दाखल्यांसह पटवून दिले. प्रास्ताविक नंदलाल शिंदे, सूत्रसंचालन शांताराम पवार यांनी केले. या वेळी मंडणगड न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. ए. शिंदे, नायब तहसीलदार संजय गुरव, गटशिक्षण अधिकारी नंदलाल शिंदे, पोलिस उपनिरीक्षक संजय धुपकर, वार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. मिलिंद लोखंडे उपस्थित होते.

संविधान पुस्तकाचे शाळांना वाटप
पंचायत समितीमध्ये झालेल्या कार्यक्रमात मंडणगड तालुक्यातील २५ माध्यमिक शाळा व १४७ जिल्हा परिषद शाळांना संविधानाच्या पुस्तकरूपातील प्रतींचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 27/Nov/2024