प्रशांत यादव यांच्या पराभवाने खचू नका, कार्यकर्त्यांनी ईर्ष्येने कामाला लागावे : दत्ताराम लिंगायत

साडवली : विधानसभा निवडणुकीत चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट यामध्ये चुरशीच्या लढतीत महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत बबन यादव यांनी शेवटच्या क्षणापर्यंत विरोधकांसमोर कडवे आव्हान उभे केले होते. या अटी-तटीच्या लढाईत प्रशांत यादव यांचा पराभव झाला. या पराभवाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने पक्ष संघटना मजबूत करण्यास आतापासूनच ईर्ष्येने कामाला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष दत्ताराम लिंगायत यांनी केले आहे.

लिंगायत म्हणाले या लढतीत महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांनी अल्पमतांनी बाजी मारली. पराभव झाला असला, तरी त्यांनी कमी कालावधीत घेतलेली मते ही निवडून आलेल्या उमेदवारांना आत्मचिंतन करायला लावणारी निश्चितच होती, हे स्वतः निवडून आलेल्या आमदारांनी मान्य केले आहे. महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते यांनी अहोरात्र कष्ट घेतले, त्या सर्वांचे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून निश्चितच आभारी आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर या मतदारसंघात पक्षाची झालेली अवस्था पाहता माजी आमदार रमेशभाई कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत यादव यांनी नव्याने पक्ष बांधणी करून मिळवलेली मते ही दूरदृष्टी आणि रोजगाराच्या माध्यमातून झालेला जनसंपर्क हे त्यांचे कष्टाचे फळ आहे. त्यांच्या पराजयातही विजय झाल्यासारखाच आहे. त्यांच्या या पराजयाने समर्थक मात्र खूपच हळहळ व्यक्त करत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी खचून न जाता नव्या उमेदीने पुन्हा पक्षाचे पक्ष संघटन करून अधिक सक्षमतेने कोणत्याही निवडणुकीला सामोरे जाऊ, असा विश्वासही लिंगायत यांनी व्यक्त केला आहे.

त्यांना’ आत्मचिंतन करावे लागेल
या लढतीत महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांनी अल्पमतांनी बाजी मारली. पराभव झाला असला, तरी त्यांनी कमी कालावधीत घेतलेली मते ही निवडून आलेल्या उमेदवारांना आत्मचिंतन करायला लावणारी निश्चितच होती, हे स्वतः निवडून आलेल्या आमदारांनी मान्य केल्याचे लिंगायत यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 AM 27/Nov/2024