गुहागर : तालुक्यातील शृंगारतळी येथे स्टार इलेक्ट्रीकल्स आणि मनी ट्रान्स्फर या दुकानाचे मालक आजिम साल्हे यांची २५ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. १९ नोव्हेंबरला झालेल्या फसवणुकीबाबत साल्हे यांनी २४ नोव्हेंबरला गुहागर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पैसे पाठविण्याच्या बहाण्याने आलेल्या गणेश उगलमुगले याने सांगितलेल्या खात्यात आजिम साल्हे यांनी पैसे पाठविले. मात्र, साल्हेंनी पाठवलेले पैसे रोख स्वरूपात देण्याची वेळ आली तेव्हा गणेश उगलमुगले नामक व्यक्तीने तेथून दुचाकीने पलायन केले.
शृंगारतळी येथे आजिम दाऊद साल्हे (३५) सन २०१४ पासून अधिकृत बँकिंग पॉईंट चालवितात. याद्वारे ग्राहकांचे पैसे त्यांच्या खात्यातून दुसऱ्याच्या खात्यात जमा करुन देण्याची सेवा दिली जाते. त्यांच्या दुकानात आलेल्या ग्राहकाने त्यांना २५ हजार रुपयांना फसविले. याबाबत पोलिस ठाण्यात त्यांनी २४ नोव्हेबर रोजी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे १९ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ८:४५ च्या सुमारास दुचाकीवरुन गणेश उगलमुगले दुकानात आले. त्यांनी त्यांच्याकडील रोख रु. २५ हजार ओव्हरसीज बँक खाते ३२०००१०००००२९८७ या खात्यावर पैसे पाठविण्यास सांगितले. पैसे पाठवल्यावर गणेश उगलमुगले यांच्याकडे २५ हजार रुपयांची मागणी केली. त्यावेळी दुचाकीला लावलेल्या पिशवीतील पैसे आणून देतो असे सांगून गणेश दुचाकीजवळ गेला. दोन मिनिटे दुचाकीला लावलेली पिशवी चाचपडून त्यातील पैसे शोधू लागला. त्याचवेळी दुचाकी सुरु करुन गुहागरच्या दिशेने गणेशने पलायन केले. याबाबतची तक्रार गुहागर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 27-11-2024














