राष्ट्रीय तायक्वाँदो स्पर्धेत राजापूरच्या रियाची सुवर्णपदकाला गवसणी

राजापूर : केंद्र शासनाच्या मान्यतेने कर्नाटक धारवाड येथील आर. एन. शेट्टी स्टेडियममध्ये झालेल्या राष्ट्रीय खेलो इंडिया अस्मिता वुमन्स लीग तायक्वांदो स्पर्धेत राजापूर तालुक्यातील रिया मयेकर हिने उत्कृष्ट खेळाच्या जोरावर सुवर्णपदकाला गवसणी घातली. तिने तायक्वाँदो खेळात राष्ट्रीय स्तरावर राजापूरचा झेंडा फडकवला.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेतही तिने पदकाची लयलूट केली होती. जिद्द, कठोर परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर रियाने हे यश मिळवले. ऑलिंपिकमध्ये खेळल्या जात असलेल्या तायक्वांदो खेळाचा खेलो इंडिया वुमन्स लिगमध्ये गेल्या दोन वर्षांपासून समावेश करण्यात आलेला आहे. केंद्र शासनाच्या मान्यतेने कर्नाटक येथे नुकतीच राष्ट्रीय स्तरावरील खेलो इंडिया तायक्वाँदो स्पर्धा झाली. या स्पर्धेमध्ये रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्टस् असोसिएशनतर्फे राजापूर प्रशिक्षण केंद्रातील रिया मयेकर सहभागी झाली होती. तिने महाराष्ट्र संघात रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व केले होते.

तायक्वाँदो खेळाची आवड असलेली रिया गेल्या सहा वर्षांपासून अॅकॅडमीत सराव करत आहे. तिला मुकेश नाचरे, मधुरा नाचरे, अंश गुंडये, श्रुतिका मांडवकर, गौरव घालवलकर यांचे मार्गदर्शन मिळते. सरावाच्या जोरावर तिने राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक पटकावले आहे. या यशाबद्दल तिचे तायक्वाँदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पाठारे, रत्नागिरी तायक्वाँदो स्पोर्टस् असोसिएशनचे अध्यक्ष राज्य संघटना कोषाध्यक्ष व्यंकटेश्वरराव कररा, जिल्हा उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, लक्ष्मण के., शशांक घडशी, राजापूरचे अध्यक्ष अभिजित तेली, उपाध्यक्ष मुकेश मयेकर यांनी अभिनंदन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:22 PM 27/Nov/2024