पावस : रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेरे सातपऱ्या पुलावरील भरावाचे काम अद्याप सुरू न झाल्यामुळे खड्डेमय रस्त्याचा सामना करावा लागत आहे. या भरावाचे काम कधी पूर्ण होणार, याची प्रतीक्षा वाहनचालक आणि ग्रामस्थांना लागली आहे.
तीन वर्षांपूर्वी गावडे आंबेरे सातपऱ्या मोठ्या पुलाचे भूमिपूजन होऊन कामाला सुरवात झाली. सुरुवातीला पुलाचा मुख्य भाग बांधून पूर्ण झाला; परंतु त्याच्या कठड्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही त्यानंतर सुरू झालेल्या पावसाळ्यामध्ये काम पूर्णपणे ठप्प झाले. त्याच्यानंतर वर्षभर त्या कामाकडे संबंधित ठेकेदाराने लक्ष न दिल्यामुळे ते काम पूर्ण होऊ शकले नाही. तसेच दोन्ही बाजूच्या भरावाचे काम पूर्णत्वाला गेले नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवरती नाराजीचा सूर दिसून आला. त्यानंतर अर्धवट स्थितीत असलेल्या कामासंदर्भात तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांना निवेदन दिल्यानंतर तातडीने गावडे आंबेरे बाजूच्या भरावाचे काम पूर्ण झाले आणि नातुंडे भागातील भरावाचे काम अर्धवट स्थितीत राहिले.
त्यामुळे पावसाळ्यामध्ये याचा परिणाम सर्वसामान्य नागरिक व वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात जाणवू लागला. खड्डेमय व चिखलाच्या मागनि पादचारी व वाहनचालक यांना जाण्याची वेळ आली. गेले सहा महिने लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
नुकताच पाऊस कमी झाल्यानंतर संबंधित पुलाच्या कठड्याचे काम संबंधित ठेकेदाराने करण्यास सुरुवात केली आणि ते काम अखेर पूर्ण झाले. त्यामुळे गावडे आंबेरे उतार ते पूल यादरम्यान संपूर्ण काम करण्यात आले. त्यामुळे लोकांना आशा निर्माण झाली की, आता उर्वरित नातुंडे भागातून भरावाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. फक्त २० टक्के म्हणजेच पुलाला जोडण्याचे काम लवकरात लवकर सुरू होईल; परंतु अद्याप त्याच कामाचा कोणताही आरंभ न केल्यामुळे नातुंडे परिसरातील भरावाचे काम कधी पूर्ण होणार, याची प्रतीक्षा आहे.
पावस ते खानवली मलकापूर ते विटा पेठ हा राज्यमार्ग आहे. या मार्गावरील अनेक रस्त्यांचे रुंदीकरण पूर्णत्वास गेले आहे. या पुलाचे काम पूर्ण झाल्यास हा रस्ता सर्वांना सोयीस्कर व चांगल्या तऱ्हेने होईल; परंतु या रस्त्याचे व पुलाचे काम पूर्णत्वास न गेल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाहनचालकांना खड्ड्यांमुळे रस्त्याचा सामना करावा लागत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:14 PM 27/Nov/2024














