रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयात टेक्नॉलॉजी इन हायर एज्युकेशन फॉर अॅक्टिव्ह लर्निंग यावर तीनदिवसीय कार्यशाळा झाली. त्यात कृती आधारित सत्रांमध्ये प्राध्यापकांना अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा अधिकाधिक सहभाग वाढवण्यासाठी उपयुक्त असे अनेक तंत्रांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळाले.
संगणक प्रयोगशाळेतील सत्रांमध्ये प्राध्यापकांना त्याचे प्रत्यक्ष उपयोजन करण्याची संधी मिळाली. नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत विषयज्ञान, अध्यापन पद्धती आणि तंत्रज्ञानाचा सक्रिय वापर या त्रिसूत्रीमध्ये प्रावीण्य मिळवणे प्राध्यापक वर्गासाठी आवश्यक आहे, हे या कार्यशाळेतून समोर आले.
प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियान (पीएम-उषा) या केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकादमी आणि सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी यांनी संयुक्त विद्यमाने आयोजित केली. उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. मकरंद साखरकर, पीएम-उषा समन्वयक शास्त्रशाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, एमएसएफडीएचे गणेश भिसे, सिम्बॉयसिसचे तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. सोफिया गायकवाड, डॉ. अश्विनी वडेगावकर, सागर जोशी उपस्थित होते.
तीन दिवसांत बारा सत्र घेण्यात आली. त्यातील प्रत्यक्ष आंतरक्रियात्मक आठ सत्रे होती. तीन सूत्रे संगणक प्रयोगशाळेत, एक ऑनलाईन पद्धतीने झाले. कार्यशाळेत डॉ. सोफिया गायकवाड यांनी अँड्रोगॉजी, रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग आणि टेक्नॉलॉजी टूल्स यांचा आंतरक्रियात्मक अध्ययन अध्यापनातील वापर याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. अश्विनी वडेगावकर यांनी मूल्यमापन प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले. डॉ. सुनंदा रॉय यांनी सहकारी अध्ययन प्रक्रियेवर प्रकाश टाकला. गणेश लोखंडे यांनी अॅक्टिव्ह लर्निंग स्ट्रॅटेजिस याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. गणेश शिंदे यांनी आयसीटी टूल्स आणि मॅसिव ओपन ऑनलाईन कोर्सेस यांच्याविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:34 PM 27/Nov/2024













