चिपळूण : पायी भारतभ्रमण केल्यानंतर चिपळूणचा सुपुत्र आशुतोष जोशी याने रविवारपासून रेवस ते रेड्डी अशी कोकण पदयात्रा आरंभ केली आहे. कोकणातील जल, जंगल आणि जमीन वाचवण्यासाठी त्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. निसर्गसमृद्ध कोकणचा चुकीच्या राजकीय धोरणांपायी आणि काही निवडक लोकांच्या आमिषापोटी ऱ्हास होत आहे. ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस हायवेसारखे प्रकल्प त्यात भर टाकत आहे. त्यामुळे ग्रामसभा घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांची मतं जाणून घेण्यासाठी पदयात्रा काढत असल्याचे जोशी यांनी सांगितले.
पदयात्रेविषयी पत्रकारांना माहिती देताना जोशी म्हणाले, कोकणच्या विकासासाठी अलीकडे रेवस-रेड्डी सागरी महामार्ग आणि ग्रीनफिल्ड महामार्ग या संदर्भात दोन नवे आदेशपत्र सरकारने जाहीर केले. नवीन महामार्गाचे भूसंपादन नोटीस यायला सुरुवात झाली आहे; पण गेल्या काही वर्षांत आपल्या सगळ्यांनाच कळून चुकलंय की, नुसतं ग्रीन लिहिलेला प्रत्येक प्रोजेक्ट इकोफ्रेंडली असतोच असं नाही. हे रस्ते अमाप जंगलतोड करणारे आहेत आणि कथाकथित ग्रीन हायवे कोकणसारख्या निसर्गाने समृद्ध असलेल्या भागात विनाश करण्यासाठी आमंत्रण ठरणारा आहे.
इंग्लंडमध्ये असताना मी पाहिलं की, लोक जंगल लावण्यासाठी प्रदर्शन करतात आणि आपण असलेली जंगल तोडताना मुकाट्याने पाहतोय. ‘मुंबई- गोवा महामार्ग’ हा जुना प्रकल्प आहे आणि त्यावर किती खर्च झाला याचा काहीच हिशोब नाही, असे असताना हे दोन नवीन महामार्ग नक्की कोणासाठी, हा प्रश्न निर्माण होतो. कोकणातील हजारो-लाखो वर्षे जुने समुद्रकिनारे आणि जंगले हे प्रकल्प पुढच्या काही वर्षात गिळून टाकतील. यावर कोकणी माणसाचं काय मत आहे, हे कोणीच विचारलेलं नाही. परस्पर ड्रोन आणि पोलिसांचे ताफे आणून हे सर्वेक्षण केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:46 PM 27/Nov/2024













