लांजा : तालुक्याचा सर्वांगीण विकास या मुद्दयावर निवडणूक लढवून किरण सामंत राजापूर-सांजा मतदारसंघातून विजयी झाले. त्यामुळे मागील ३० वर्षांपासून रखडलेल्या तालुक्यातील मिनी एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा लांजा तालुक्यातील तरुणवर्गाकडून व्यक्त केली जात आहे.
गेल्या तीस वर्षापेक्षा अधिक काळ शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या या तालुक्यात औद्योगिक विकासाची गंगा येऊ शकलेली नाही. येथील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळेल या दृष्टीने एखादी मिनी एमआयडीसी यावी, असे प्रयत्न लोकप्रतिनिधींकडून झाले नाहीत. परिणामी, आजही येथील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीसाठी मुंबई-पुण्याची वाट धरावी लागत आहे. ही वस्तुस्थिती आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा शहराचा झपाट्याने विकास होणे अपेक्षित होते; मात्र औद्योगिक क्षेत्राबाबत आजही लांजा तालुका मागासलेलाच आहे. माजी मंत्री रवींद्र माने यांच्या माध्यमातून तालुक्यातीत गावागावांमध्ये रस्त्यांचे जाळे विणले गेले होते तर मार्लेश्वर फळप्रक्रिया या संस्थेच्या माध्यमातून लांजा तालुक्यात प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तसेच भांबेड येथे मिनी एमआयडीसीसाठी त्यांनी प्रयत्न केले होते; मात्र शेवटपर्यंत ती कागदावरच राहिली होती.
लांजा तालुक्यात वाकेड येथे असाई इंडिया क्लास ही एकमेव कंपनी होती. त्यात तालुक्यातील अनेक व्यक्तींची चारचाकी वाहने कामाला होती. त्यातून अनेकांना रोजगारही प्राप्त झाला. त्या कंपनीत ५० कायमस्वरूपी कामगारांसह ५० कंत्राटी कामगार तसेच ७ गार्डन कर्मचारी, ३० सिक्युरिटी गार्ड यांना रोजगार उपलब्ध झाला. तसेच कंपनीत ७२ अवजड वाहने, १३ ट्रान्सपोर्ट ठेकेदार असा कंपनीचा पसारा होता. त्या कंपनीमुळे स्थानिकांना हॉटेल व्यवसाय, टायर दुरुस्तीसारखे रोजगार उपल्ब्ध झाले होते. वाकेड ग्रामपंचायतीला वर्षाकाठी सुमारे ५६ हजार रुपयांचा कर मिळत होता त्यानंतर ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकांनी केलेली भाडेवाढ आणि कंपनीविरुद्ध पुकारण्यात आलेल्या आंदोलनामुळे कंपनी व्यवस्थापनाने हा प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला होता. कंपनी बंद पडली आणि त्या कंपनीवर अवलंबून असणारे शेकडो तरुण बेरोजगार झाले आहेत. या कंपनीच्या माध्यमातून तालुक्यात असणारा औद्योगिकत्माचा ठसा पुसा गेला आहे.
दरम्यान, उदय सामंत यांनी लांजा येथे मार्गदर्शन करताना तुम्ही शंभर एकरपासून ४०० एकरपर्यंत जागा द्या. योग्य जागा असल्यास एमआयडीसी मंजूर करून देतो, असे सांगितले होते. त्यामुळे मिनी एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागेल, अशी आशा आहे.
तालुक्यात एमआयडीसी व्हावी म्हणून मी कित्येक वर्षे झगडत होतो. जागासुद्धा उपलब्ध करून दिली होती मात्र त्याकडे संबंधित सरकारने दुर्लक्ष केले होते. आता विद्यमान आमदार त्याकडे लक्ष देतील, अशी आशा आहे. – मनोहर रेडीज, लांजा
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:22 PM 27/Nov/2024












