शिवसेनेचे सर्व खासदार गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार

मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे खासदार (Shiv Sena MP) आज दुपारी 4 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संसद भवनातील कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सर्व खासदारांना सूचना देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रातील राजकीय वादावर तोडगा काढण्यासाठी ही महत्त्वाची बैठक मानली जातेय. शिवसेनेच्या खासदारांनी अमित शाह यांना भेटण्याची वेळ मागितली होती. त्यानुसार खासदार आज त्यांची भेट घेणार आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) निकालानंतर मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेलं नाही. महायुतीतील घटक पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ सुरू आहे. भाजपच्या काही नेत्यांनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी पुन्हा एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्याचबरोबर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी अशी इच्छा देखील व्यक्त केली आहे. महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण असणार, ही निवडण्याची मोठी जबाबदारी राजनाथ सिंह यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव सर्वात पुढे आहे. आज संध्याकाळी दिल्लीत होणाऱ्या वरीष्ठ नेत्यांच्या बैठकीत नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. निवडणुकीत भाजपला मिळालेले मोठे यश आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मिळालेल्या यशानंतर भाजपच्या वरीष्ठ नेत्यांकडून शिक्कामोर्तब होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:44 27-11-2024