रत्नागिरी : शिरगावातील वीर सावरकरांच्या वास्तव्य खोलीला १०० वर्षे पूर्ण

रत्नागिरी : अंदमानातून सुटका झाल्यानंतर कोणत्याही सक्रिय राजकारणात भाग घ्यायचा नाही, या बंधनावर स्वातंत्र्यवीर सावरकरांना रत्नागिरीत राजकीय बंदिवान म्हणून आणण्यात आले; परंतु प्लेगची साथ आल्यामुळे सावरकरांना शिरगाव, गायवाडी येथील टिळकांचे अनुयायी (कै.) विष्णुपंत काशिनाथ दामले यांनी शिरगावात बोलावले. आपल्या घरातील धान्याचे कोठार रिकामे करून सावरकरांना तिथे ठेवले. २७ नोव्हेंबर १९२४ ला सावरकर शिरगावात वास्तव्यास आले आणि या ऐतिहासिक घटनेला आज (ता. २७) शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. दामले यांच्या घरातील ही खोली आणि सावरकरांची लेखणी, दिवा, हस्ताक्षराची प्रत आजही जतन करून ठेवली आहे.

शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर मत्स्य महाविद्यालय आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक संकुलामुळे नावाजलेले विद्याकेंद्र बनले आहे. तेथील ग्रामपंचायतीच्या नजीकच असलेल्या गायवाडीत दामले यांचे घर आहे. सावरकरांची खोली दामले कुटुंबीयांनी १०० वर्षे जतन करून ठेवली आहे, हे विशेष. याच खोलीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव हेडगेवार व वीर सावरकरांची २९ मार्च १९२५ ला भेट झाली होती. त्यानंतरच संघाची स्थापना झाली. याच घरामध्ये सावरकरांनी उःपाप या नाटकाच्या लेखनाला सुरुवात केली आणि हिंदू पद‌पातशाही हा ग्रंथ लिहिला. येथे मुंबईच्या सावरकर दर्शन प्रतिष्ठान व श्री पतितपावन मंदिराने लावलेल्या फलकाचे अनावरण ६ मार्च २००६ ला संघाचे विद्यमान सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. वीर सावरकर २७ नोव्हेंबर ते जून १९२५ पर्यंत शिरगावात वास्तव्याला होते. या कालावधीत त्यांनी सर्व हिंदूंची मोट बांधली. सावरकरांच्या विनंतीवरून हिंदू धर्मातील सर्व महिलांचे हळदी-कुंकू झाले. बाबा शिरगावकर यांच्या घरी सत्यनारायण पूजेसाठीही सावरकर हे लहान मुलांना घेऊन गेले होते. मराठी शाळेत सवर्ण व अस्पृश्यांची मुलांना बसण्यास वेगळी व्यवस्था होती; परंतु सावरकरांच्या विनंतीनंतर सर्व मुले एकत्र बसू लागली, असे शैला दामले यांनी सांगितले. दरम्याम, सावरकर यांना घरी वास्तव्यास आणणारे (कै.) रामचंद्र विष्णू दामले हे शिरगाव हिंदू महासभेचे कार्यवाह होते. (कै.) मोरेश्वर विष्णू दामले हे स्वातंत्र्यवीरांचे लेखनिक होते. नारायण विष्णू दामले यांनी हैदराबाद सत्याग्रहात भाग घेतला. गजानन विष्णू दामले हे स्वातंत्र्यवीरांचे स्वीय सहायक होते.

माझ्या आजेसासऱ्यांनी वीर सावरकरांना आमच्या घरी आणले. आमच्या पाचव्या पिढीनेही ही खोली जपली आहे. सावरकरांवर अभ्यास करणारे अभ्यासक, संशोधक तसेच देश-विदेशातून सावरकरप्रेमी नागरिक येथे नतमस्तक होण्यासाठी येतात. अंदमान, कारागृह कोठडीप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांनी येथे आवर्जून यावे. शैला दामले, शिरगाव

इथे रचले सकल बंधू हिंदू गीत
शिरगावातील हनुमान मंदिर ऐतिहासिक आहे. १९२५ मध्ये महादेवबुवा ऊर्फ साधू लिंगायत यांनी शिरगावात हनुमान मंदिर उभारले. वीर सावरकरांनी सर्व हिंदू एकत्र येणार असले तरच मंदिराच्या उद्घाटनाला येतो, असे त्यांना कबूल केले आणि वीर सावरकरांनी रात्री जागून तुम्ही आम्ही सकल बंधू हिंदू हिंदू हे गीत रचले. उद्घाटनाच्या दिवशी हे गीत सुरेल आवाजात सर्वांनी म्हटले.

शिरगावातील ठळक घडामोडी
८ जानेवारी १९२४ ला रत्नागिरीत आगमन, २३ जानेवारी १९२४ ला रत्नागिरी हिंदू सभेची स्थापना. १ जुलै १९२४ प्लेगच्या साथीमुळे नाशिकला प्रयाण. २४ नोव्हेंबर १९२४- रत्नागिरीस पुनरागमन. २७ नोव्हेंबर- शिरगावला विष्णुपंत काशिनाथ दामले यांचे घरी आगमन. मार्च १९२५- सावरकर हेडगेवार भेट. मार्च १९२५- मद्रासचे प्रसिद्ध क्रांतिकारक ऋषीजी तथा ऋणा व्ही. व्ही. एस. अय्यर व सावरकर यांची भेट. १९ एप्रिल १९२५- शिरगाव मारुती मंदिरातील संमिश्र, दिंडी व हिंदू एकता गीत तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू सादरीकरण. एप्रिल १९२५- शिरगांवातील पहिले संमिश्र हळदीकुंकू, २० जून १९२५- शिरगावातून रत्नागिरीत स्थलांतर.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:50 PM 27/Nov/2024