मुंबई : शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली. भाजपचं केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली.
आपण नाराज नसल्याचंदेखील एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला आहे. आपला महायुतीच्या मुख्यमंत्र्यांना पूर्ण पाठिंबा असेल, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. एकनाथ शिंदे यांनी ही भूमिका मांडल्यानंतर भाजपची नागपुरात पत्रकार परिषद पार पडली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी भूमिका मांडली. बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुकदेखील केलं.
“महायुतीचे आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मी आभार मानतो. कालपासून विरोधी पक्षाचे लोकं हे शिंदे यांच्याबद्दल ते नाराज आहेत, अशा पद्धतीच्या वावड्या उठवत होते. एकनाथ शिंदे सारख्या कर्तबागर व्यक्तीबद्दल त्यांच्या व्यक्तीमत्त्वावर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे प्रयत्न केले. पण शिंदे यांनी महायुतीचे नेते म्हणून अत्यंत स्पष्टपणे या महाराष्ट्रातील जनतेला आणि राज्यातील सर्व जनतेला त्यांनी प्रेसच्या माध्यमातून आपली भूमिका व्यक्त केली”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
चंद्रशेखर बावनकुळे यांचा विरोधकांवर निशाणा
“मोदी आणि शाह आणि केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय घेतील, त्याला पूर्ण समर्थन राहील असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. महायुती म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका घेतली. विरोधी पक्षाच्या तोंडाच्या वाफा सुरू होत्या त्या वाफाच राहिल्या. शिंदे यांनी राज्याच्या विकासासाठी त्यांनी काम केलं आहे. आम्ही आधीपासून त्यांचं काम पाहत आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी चांगलं काम केलं”, असं मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडलं.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:56 27-11-2024