रत्नागिरी : राज्य नाट्य स्पर्धेतील उत्साह आणि नाटकांची संख्या वाढणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या सांस्कृतिक चळवळीलाच चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष समीर इंदुलकर यांनी केले.
त्रेसष्टाव्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात मंगळवारी उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, नाटक ही मराठी माणसांची सांस्कृतिक चळवळ आहे. सलग ६३ वर्षे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे स्पर्धा होत आहे. यावर्षी राज्य नाट्य स्पर्धेत संघ कमी आहेत. यापुढे होणाऱ्या स्पर्धेसाठी नाटकांची संख्या जास्तीत जास्त वाढावी, यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे उत्सवी नाटकांचा महोत्सव घेण्यात येणार आहे.
यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी प्रकाश ठीक, सेन्सॉर बोर्ड सदस्य राजेश गोसावी, परीक्षक शिवानंद चलवादी, कैलास टापरे, मीना वाघ, स्पर्धेचे समन्वयक नंदू जुवेकर आणि नाट्यकर्मी दत्ता केळकर उपस्थित होते.
स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील आठ नाटके सादर होणार आहेत. पहिल्या दिवशी येळवण (ता. राजापूर) येथील श्री शिवाई सहकारी पतसंस्थेचे माझ्या आजीचा बॉयफ्रेंड हे नाटक सादर करण्यात आले. राजेश देशपांडे यांनी लिहिलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन सचिन शिंदे यांनी केले. कोकणातल्या रेगे नावाच्या वृद्ध जोडप्याच्या प्रेमाची ही गोष्ट आहे. रेगेंचा मुलगा शिकायला लंडनमध्ये गेला. तो तिकडच्या गोऱ्या मुलीशी लग्न करून तिथेच स्थायिक झाला. त्यामुळे वडील त्याच्यावर चिडले आहेत. त्यांच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाला त्यांचा नातू आणि त्याची प्रेयसी गावी येतात. पेटीत जपून ठेवलेल्या जुन्या गोष्टी पाहत असताना आजीच्या शाळेतल्या जपून ठेवलेल्या वहीत तिला कुणीतरी लिहिलेले प्रेमपत्र सापडते आणि संशयनाट्य सुरू होते. अनेक धमाल घटना घडत शेवटी सत्य बाहेर येते. हसत खेळत प्रेम, नाती, लग्न संस्था, संस्कार, संस्कृती या हे नाटक भाष्य करते.
नाटकात आजोबा झालेल्या सचिन शिंदेंनी चांगले काम केले. आजी झालेल्या प्रज्ञा वारणकर यांनीही त्यांना चांगली साथ दिली. अँजेलिना झालेल्या प्राची रिंगेने भूमिका साकारताना परदेशी असण्याचा, लंडनमधील मुलगी मराठी बोलताना कशी बोलत असेल, याचा आवश्यक तो अभ्यास करायला हवा होता. शुभ (चैतन्य राव). रती राणे (समीक्षा जाधव) य़ांच्या भूमिका चांगल्या होत्या. मदन बाणे झालेल्या विजय मिरगेने मनोरुग्णाची भूमिका साकारताना धमाल उडवून दिली. नाटकातील काही अश्लील शब्द टाळता आले असते. नेपथ्यकार दीपक लांजेकर, रोशन परुळेकर यांनी कोकणातील घराचे दृश्य चांगले साकारले होते.
नाटकाला ४०४ प्रेक्षक उपस्थित होते. प्रत्येकी १५ रुपयांची २१७, तर १० रुपयांची १०० तिकिटे विकली गेली.
एकूण ४ हजार २५५ रुपयांची तिकीटविक्री झाली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:34 27-11-2024












