रत्नागिरी : महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -२०२४ दि. १ डिसेंबर रोजी होणार आहे. परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात परीक्षेच्या दिवशी सकाळी ८ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी लागू केले आहेत.
ही परीक्षा रत्नागिरीतील १. गोगटे जोगळेकर महाविद्यालय (लॉ कॉलेज), २. फाटक हायस्कूल या दोन उपकेंद्रावर रविवार, दि. १ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा सकाळी १०.०० ते १२.०० व दुपारी ३.०० ते ५.०० या वेळेत दोन सत्रात घेण्यात येणार असून एकूण ८६७ उमेदवारांना या परीक्षेस प्रवेश देण्यात आला आहे.
परिसरातील एस.टी.डी. बूथ, झेरॉक्स सेंटर, टायपिंग सेंटर, ध्वनिक्षेपण इ. माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत बंद राहतील. परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन, सेल्यूलर फोन, फॅक्स, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेऊन प्रवेश करण्यास मनाई असेल.
कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यास मनाई असेल. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस, वाहनास प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 AM 28/Nov/2024














