दापोली : दापोलीचा पारा बुधवारी १०.५ वर आला असून, कडाक्याची थंडी आहे; मात्र बंगालच्या उपसागरात वादळसदृश परिस्थितीमुळे जर वादळ झालं तर पुढील आठवड्यात पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी विभागातील गिम्हवणे येथील हवामान केंद्राने वर्तवला आहे.
गेल्या आठवड्याभरापासून दापोलीमध्ये पहाटे आणि सायंकाळी पाचनंतर गारठा आहे. येथील नागरिकांच्या अंगावर स्वेटर, शाली चढू लागल्या आहेत. गेल्या आठवड्यात २१ नोव्हेंबरला १०.९ इतका पारा खाली आला होता. बुधवारी (ता. २७) पारा १०.५ अंशापर्यंत खाली आला.
किनारपट्टीवर पहाटेपासून किमान दोन ते तीन तास जोरदार उत्तरेकडील वारे वाहत होते. कडाक्याची थंडी पडली होती. दुपारी ११ वाजेपर्यंत बोचरी थंडी जाणवत होती. गेल्या दोन दिवसांत १ ते २ अंशांनी तापमानात घट झाली आहे. आंबा, काजूच्या झाडांना पालवी येऊ लागली आहे. दापोलीच्या किनाऱ्यावर थंडीच्या दिवसात सीगल पक्ष्यांचे आगमन झाले आहे. समुद्रकिनारी सफेद चादर अंथरल्यासारखी दिसत आहे. सकाळी या पक्ष्यांची गजबज पाहताना एक वेगळीच गंमत वाटते. थंडीचा जोर वाढत असताना बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे;
तसेच हिमालयातही बर्फवृष्टी सुरू झाल्याने महाराष्ट्रावर त्याचा परिमाण होऊ लागला आहे. या वर्षात १०.५ हे पहिल्यांदा खाली उतरलेले तापमान आहे. ते साधारण १२ ते १३ अंशावर स्थिर राहत ते जास्त जर खाली उतरले तर आंबा व काजू बागायतदारांना धोक्याचे ठरू शकते. बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या वादळसदृश परिस्थितीमुळे तापमान १ ते २ अंशांनी वाढेल.
“ज्या शेतकऱ्यांनी भात कापणी करून ते तसंच जर शेतात ठेवलं असेल तर ते वेळीच झोडणी करून लवकरात लवकर व्यवस्थित सुरक्षित जागी ठेवावे”. – डॉ. विजय मोरे, गिम्हवणे हवामान केंद्र अधिकारी.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 28-11-2024














