राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघात प्रशासकीय कामकाज, आरोग्यसेवेसाठी स्वतंत्र टीम : अपूर्वा सामंत

राजापूर : राजापूर लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघातील जनतेला विकासाची आस लागलेली आहे. जनतेने टाकलेला विश्वास आम्ही विकासकामातून सार्थ ठरवू, प्रशासकीय कामकाज आरोग्यसेवा यासारख्या कामांसाठी स्वतंत्र टीम काम करेल किरण सामंत यांचे संपर्क कार्यालय, पक्षाच्या शाखा आणि पदाधिकारी २४ तास जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध असतील, असे अपूर्वा सामंत यांनी सांगितले.

राजापूर येथे पत्रकारांबरोबर बोलताना त्या म्हणाल्या, गेली सहा महिने मतदार संघातील वाडीवस्तीवर फिरले. काका उदय सामंत आणि वडील किरण सामंत यांचा या मतदार संघातील प्रत्येक भागात संपर्क होता. त्याची प्रचिती मतदार संघात फिरताना आली. प्रत्यक्षात निवडणुकीच्या रिंगणात वडील उतरल्यामुळे वाडीवस्तीवर घराघरात फिरता आले. जनतेच्या समस्या, प्रश्न याची पूर्ण जाणीव निर्माण झाली. विकासाच्या परिवर्तनासाठी वडिलांच्या रूपाने हक्काचा माणूस येथे निवडून आला आहे. निवडणूक झाली आणि राजकारण संपले. आता या मतदार संघातील जनतेसाठी काम करायचे आहे. त्यासाठी आम्ही सगळे काम करणार आहोत. सर्वांगीण विकास करून या मतदार संघाला विकासाच्या प्रवाहात आणावयाचे आहे. त्यासाठी दिलेली भक्कम साथ ही भविष्यातील काम करण्यासाठी माझे वडील आमदार किरण सामंत यांच्यासाठी एक ऊर्जा ठरणार आहे. त्यामुळे एक विकसित मतदारसंघ अशी नवी ओळख निर्माण करू, असे त्यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 28/Nov/2024