राजापूर : विधानसभा निवडणूक प्रचारात सर्वच राजकीय पक्षांनी प्रकल्पविरोधी भूमिका घेतल्यामुळे बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प रद्द होण्याचे संकेत मिळू लागले होते; मात्र महायुतीची राज्यात सत्ता आल्यानंतर लगेचच राजापूर तालुक्यातील विल्ये (नाणार) दशक्रोशी रिफायनरी समर्थक समितीने विजयदुर्ग बंदरासह नाणार परिसरातच रिफायनरी प्रकल्प उभारा, अशी मागणी करणार असल्याचे जाहीर केले आहे तसेच नव्या सरकारमधील नेत्यांची भेट घेऊन हजारो एकर जमिनीची शेतकऱ्यांनी दिलेली संमतीपत्रेही दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोकणातील रखडलेल्या तेल शुद्धीकरण (रिफायनरी) प्रकल्पाला गुजरात किंवा आंध्रप्रदेशमध्ये हलवण्याची तयारी केंद्र सरकारकडून केली जात असल्याचे वृत्त पुढे आले आहे. असे असतानाच विधानसभा निवडणुकीनंतर तातडीने रिफायनरी समर्थकांनी सकारात्मक पावले उचलली आहेत. महायुतीने महाराष्ट्रात विजयी आघाडी घेतल्यानंतर रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधानसभा समन्वयक प्रमोद जठार यांनी कोकणात दोन लाख रोजगार देणारा रिफायनरी प्रकल्प नाणार येथे करावा, अशी मागणी केली आहे तसेच नाणार परिसरातील सुमारे साडेआठ हजार एकर जमिनीची संमतीपत्रे सरकारकडे सुपूर्द करण्याची तयारीही दर्शवली आहे. त्या संमतीपत्राच्या आधारे राज्यातील नव्या सरकारने रिफायनरी प्रकल्प नाणार परिसरात राबवावा, अशी मागणी केली आहे तसेच या प्रकल्पाबाबत नव्या सरकारमधील नेत्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. जठार यांनी मांडलेल्या भूमिकेला राजापूर येथील विल्ये दशक्रोशी रिफायनरी समर्थक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे.
नाणार (ता. राजापूर) परिसरातील विजयदुर्ग बंदर हे उत्तम नैसर्गिक खोली असणारे बंदर आहे. रिफायनरी प्रकल्पासोबत या बंदराचाही विकास होणार आहे. त्याचा फायदा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी होणार आहे. या प्रकल्प उभारणीसाठी शेतकर्यांनी सुमारे साडेआठ हजार एकर जमिनीची संमतीपत्रे दिली आहेत. प्रकल्पविरोधी असलेली नाणारसह अन्य गावे आणि काही वाड्या वगळून विल्ये दशक्रोशी रिफायनरी समर्थक परिसराचा आराखडाही तयार केला आहे. त्यामुळे नाणार परिसरात रिफायनरी प्रकल्पाची उभारणी व्हावी, अशी मागणी समर्थक समितीने केली आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार नारायण राणे, राजापूरचे आमदार किरण सामंत, आमदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, रिफायनरी प्रकल्पाचा सतत पाठपुरावा करणारे माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह अन्य नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचित शासनाकडे नाणार परिसरात रिफायनरी प्रकल्पाची उभारणी व्हावी, अशी मागणी विल्ये (नाणार) दशक्रोशी रिफायनरी समर्थक समितीतर्फे करण्यात येणार आहे. – अविनाश महाजन, विल्ये (नाणार) दशक्रोशी रिफायनरी समर्थक समिती
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 28-11-2024














