साडवली : संगमेश्वर तालुक्यातील जाखमाता ताम्हाने संघातून कबड्डी खेळणाऱ्या ताम्हाने येथील सिद्धेश तटकरेने मोठी भरारी घेतली आहे. त्याची प्रो कबड्डी लीगसाठी निवड झाली आहे. सुरुवातीला स्थानिक संघातून आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून सिद्धेशने किशोर गट, कुमार गट, खुला गट यातून जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. कालांतराने तो कामानिमित्त मुंबईला गेला. तिथे त्याला मुंबईच्या सुप्रसिद्ध अंकुर संघातून खेळण्याची संधी मिळाली. याच काळात त्याला कबड्डी प्रशिक्षक प्रशांत सुर्वे यांचे मार्गदर्शन लाभले. मुंबई उपनगरच्या खुल्या गटात त्याची निवडही झाली होती. त्याच वेळेस त्याने आपल्या खेळाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याच्या उत्तम खेळामुळेच त्याला आता प्रो-कबड्डीची दारे खुली झाली आहेत. ताम्हाने पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अशोक सप्रे, सर्व संचालक, माध्यमिक विद्यामंदिर ताम्हानेचे मुख्याध्यापक मारुती चोरमाले यांनी सिद्धेशचे अभिनंदन केले. सिद्धेशने मिळवलेल्या या यशाबद्दल त्याच्यावर तालुकाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 AM 28/Nov/2024














