खेड : अतिवृष्टीत कोसळलेली विहीर पुन्हा न बांधल्याने जानकरवाडीत भीषण पाणीटंचाई

खेड : तालुक्यातील घेरारसाळगड चिराचाआंबा जानकरवाडी येथे सन २०२२ मध्ये अतिवृष्टीत कोसळलेली विहीर पुन्हा बांधण्यात न आल्याने सध्या तेथे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. निधी मंजूर असतानादेखील काम होत नसल्याने ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत आहेत.

चिराचाआंबा जानकरवाडी येथे २५ वर्षांपूर्वी शासकीय निधीतून विहीर बांधण्यात आली. सन २०२२ मध्ये अतिवृष्टीत विहीर कोसळली. त्यावेळी घेरारसाळगड ग्रामपंचायत व महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, रत्नागिरी या संस्थेने सातत्याने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे गतवर्षी उन्हाळ्यात ग्रामस्थांना तात्पुरती पाण्याची सोय करण्यात आली. त्यावेळी विहीर अतिवृष्टीच्या आराखड्यात घेण्यात आली. परंतु, निधी मंजूर झाला नाही.

ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता खेड यांच्या सांगण्यावरून ठेकेदार यांनी सलग ८ दिवस मजूर लावून विहीरीतून गाळ काढला. पुढे विहिरीच्या बांधकामाला निधी मंजूर न झाल्याने विहीर पुन्हा गाळाने भरून गेली. सन २०२३ साली जलजीवन योजनेंतर्गत या विहिरीला निधी मंजूर झाला. ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व संबंधित ठेकेदार यांना वारंवार विनंती करूनही विहिरीचे काम वेळेवर केलेले नाही. बांधकाम न झाल्यामुळे २०२४ च्या पावसाळ्यात विहीर गाळाने भरून गेली आहे. येथील ग्रामस्थ पाण्यासाठी हा त्रास सलग दोन उन्हाळे सहन करत आहेत, अशी माहिती रामचंद्र बाबू आखाडे जिल्हाध्यक्ष महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, रत्नागिरी यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 PM 28/Nov/2024