चिपळूण : टेरवममधील कोळसा भट्ट्यांविरोधात आंदोलनाचा इशारा

चिपळूण : तालुक्यातील टेरव येथे बंदी असताना कोळसा भट्टया राजरोसपणे धगधगत आहेत. त्यामुळे विनापरवाना सुरू असलेल्या या कोळसा भट्ट्यांवर कारवाई करावी, अशी तक्रार टेख ग्रामस्थांनी वन विभागाकडे निवेदन देत केली आहे. कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

टेरव येथील अनंत कराडकर, परशुराम कुंभार, एकनाथ माळी, रामचंद्र शरकर, रमेश माळी या ग्रामस्थांनी वनविभागास दिलेल्या निवेदनानुसार, कोळसा भट्टीप्रकरणी गतवर्षी तक्रार केल्यानंतर काही प्रमाणात वन विभागाने कारवाई केली. परंतु, त्यामध्ये सातत्य राहिलेले नाही. टेरव येथे विनापरवाना जंगलोड करून कोळसा भट्टया लावल्या जातात. गेल्या दोन महिन्यापासून येथे पुन्हा कोळसा भट्टया धगधगत आहेत. याबाबतची माहिती काही दिवसांपूर्वीच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. मात्र, अद्याप त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.

संपूर्ण महाराष्ट्रात कोळसा भट्टयांवर राज्य शासनाची बंदी आहे. टेरव येथेही वन विभागाने अद्याप मान्यता दिलेली नाही. तरीही या कोळसाभट्टया धगधगत आहेत. येथील कोळशाचा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा आदी जिल्ह्यात पुरवठा केला जात असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे. धगधगणाऱ्या कोळसा भट्ट्याचे छायाचित्रण करून त्याची माहिती ग्रामस्थांनी वन विभागास दिली आहे. गेले काही दिवस वन विभागाचे अधिकारी विधानसभा निवडणूक कामात व्यस्त होते. कोळसा भट्टीवर कारवाई कधी करणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागलेले आहे. कोळसा भट्टी लावण्यास बंदी असताना राजरोसपणे या भट्टया धुमसत आहेत त्यामुळे बंदी आदेश असताना यातून कोणाची चांदी होते, असा प्रश्न ग्रामस्थ आता विचारत आहेत.

वन विभागाच्या कारवाईचा धाक नाही
विनापरवाना जंगलतोड करून कोळसा भट्ट्या लावण्याचे काम आजपर्यंत बंद झालेले नाही. राज्य शासनाची कोकणात कोळसा उत्पादनावर बंदी असतानाही येथे विना परवाना जंगलतोड करून कोळसा भट्टया धगधगत आहेत. तक्रार करूनही वन अधिकारी गांभियनि लक्ष देत नाहीत. योग्य ती कारवाई करीत नाहीत. त्यामुळे कोळसा माफियांना वन विभागाच्या कारवाईचा धाक राहिलेला नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 PM 28/Nov/2024