रत्नागिरी : घरातील एका जुन्या पेटीत आजीच्या बॉयफ्रेंडच प्रेमपत्र नातवाला सापडते आणि इथूनच संशयाला सुरुवात होते. जुनी पिढी आणि नवी पिढी यामधील फरक दाखवत उत्कृष्ट अभिनयाची सांगड पाहायला मिळाली. पात्रांच्या संवादामध्ये विनोदाचे टायमिंग जुळून आल्याने नाट्यगृहात हास्याचे फवारे त्याचबरोबर टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळाला. नाट्य स्पर्धेला दमदार सुरुवात झाली आहे.
राज्य नाट्य स्पर्धेला रत्नागिरी केंद्रावर मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी लेखक राजेश देशपांडे, दिग्दर्शक सचिन शिंदे यांनी आजीचा बॉयफ्रेंड हा नाट्य प्रयोग सादर केला. हे नाटक विनोदी अंगाने दाखवण्यात आले. तसेच काही क्षणाला गंभीरताही दाखवण्यात आल्याने प्रेक्षकांच्या डोळयाच्या पाण्या ओलावल्या होत्या. अगदी सर्व बाजूने हे नाटक उत्कृष्ट झाले.
कोकणातल्या रेगे नावाच्या वृद्ध जोडप्याच्या प्रेमाची ही गोष्ट आहे. रेगेंचा मुलगा शिकायला लंडनमध्ये गेला तो तिकडच्या गोऱ्या मुलीशी लग्न करून तिथेच स्थायिक झाला. त्यामुळे बडील त्याच्यावर चिडले आहेत. आजी-आजोबांच्या लग्राच्या ५० व्या वाढदिवसाला अमेरिकेतील नातू आणि त्याची प्रेयसी गाथी येतात. यावेळी नातू हा लिव्ह इन राहत असल्याचे सांगितल्यानंतर आजोबांचा पारा चढतो. यावेळी पूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यावर भाष्य करण्यात आले. यावेळी नातू आणि त्याची प्रेयसी घरात पेटीत जपून ठेवलेल्या जुन्या गोष्टी पाहत असताना आजीच्या शाळेतल्या जपून ठेवलेल्या वहीत तिला मदन बाणे नावाच्या माणसाला लिहिलेलं प्रेमपत्र सापडतं आणि संशय नाट्य सुरू होतं. यावेळी आजोबासुद्धा आपण रती नावाच्या मुलीवर प्रेम करत होतो, असे सांगतात. यानंतर आजी-आजोबांची भांडणं सुरू होतात, शेवटी मदन व रतीला बोलावण्याचा निर्णय होती. यावेळी वर्तमान पत्रात जाहिरात दिली जाते. जाहिरात वाचून हे दोघे येतातसुद्धा आणि यानंतर अनेक धमाल घटना घडत शेवटी सत्य बाहेर येतं. हसत खेळत प्रेम, नाती, लाग्न संस्था, संस्कार, संस्कृती याबर हे नाटक भाष्य करतं.
यामध्ये मदन बाणे या पात्राने प्रेक्षकांची मने जिंकली. त्याचबरोबर आजोबा, आजी या दोन्ही पात्रांनी आपल्या भूमिकेला न्याय दिला त्यांच्या जोडीला अँजेलिना, शुभ, रती राणे यांनीसुद्धा उत्कृष्ट संवादफेक करत प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
रंगमचावरील व्यवस्था तर लाजवाब झाली होती. गावातील चिरेबंदी पर दाखवण्यात आले होते. त्याची सजावटही उत्तम करण्यात आली होती. नेपथ्यसुद्धा छान होते. सर्वच बाजूने हे नाटक लय भारी झाले.
या नाटकात आजोबांची भूमिका सचिन शिंदे, आजी-प्रज्ञा बारणकर, अँजेलिना-प्राची रिंगे, शुभ चैतन्य राव, रती राणे समीक्षा जाधव, मदन बागे विजय मिरगे, नेपथ्य दीपक लांजेकर, रोशन परुळेकर, पार्श्वसंगीत संग्राम लवटे, तर प्रकाश योजना स्वप्निल आगवेकर यांनी काम पाहिले.
प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या नाट्य स्पर्धेला प्रेक्षकांनी सुरुवातीलाच चांगला प्रतिसाद दिला. गेल्या काही वर्षांचा अनुभव लक्षात घेता १०० पेक्षा कमीच प्रेक्षक उपस्थित असतात. यावर्षी मात्र नाट्यगृहात तब्बल ४०४ प्रेक्षक उपस्थित होते. पहिल्याच नाटकाला इतकी गर्दी झाल्याने पुढील आठ दिवस होणाऱ्या नाटकाला असाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:54 28-11-2024














