रत्नागिरी : गीता जयंती उत्सवानिमित्त ७ ते ११ डिसेंबरला विविध स्पर्धा

रत्नागिरी : येथील गीता मंडळातर्फे गीता जयंतीच्या उत्सवानिमित्त ७ ते ११ डिसेंबर या कालावधीत येथील गीता भवनात विविध स्पर्धा आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. स्पर्धकांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

शनिवारी (ता. ७) सकाळी साडेआठ वाजता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सुलेखन स्पर्धा. ही स्पर्धा तीन गटात होणार आहे. सकाळी सव्वा नऊ वाजता गट पहिला सहा वर्षावरील मुले यांची पठण स्पर्धा होईल. पहिल्या गटासाठी मनाचे श्लोक १ ते ७. दुसऱ्या गटात पहिली ते दुसरीसाठी पसायदान, तिसऱ्या गटात तिसरी ते चौथीसाठी रामरक्षा, चौथ्या गटात पाचवी ते सातवीसाठी गीताई अध्याय तिसरा (मराठी), पाचव्या गटात आठवी ते बारावीसाठी श्रीमत् भगवद्गीता अध्याय ९वा. चित्रकला स्पर्धा दुपारी १२ ते २ या वेळेत होईल. यासाठी पाचवी ते सातवी गटासाठी बालगोपाळ आणि आठवी ते दहावीसाठी श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश या विषयावर चित्र काढायचे आहे. यासाठी पेपर दिला जाईल. सायंकाळी ४ वा. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी भक्तीगीत स्पर्धा होईल.

८ डिसेंबरला सकाळी आठ वाजता सूर्यनमस्कार स्पर्धा, पाचवी ते सातवी ५ सूर्यनमस्कार, आठवी ते दहावी १० सूर्यनमस्कार. सकाळी ९.३० वा. योगासन स्पर्धा होईल. पहिला गट आठवी ते दहावी. गट तिसरा खुला (महिला). दोन्ही गटासाठी सर्वांगासन, चक्रासन, भूजंगासन, धुरासन, अर्धमत्स्येंद्रासन ही योगासने करावयाची आहेत. सायंकाळी चार ते सात या वेळेत रांगोळी स्पर्धा होईल. पहिला गट १६ वर्षाखालील मुले व मुली आणि गट दुसरा १६ वर्षावरील मुले व मुलींसाठी हॉलच्या लादीवर २ बाय २ फूट दिलेल्या चौकोनात आवडीची रांगोळी काढवयाची आहे. बुधवारी (ता. ११) सकाळी ९ वा. सामूहिक श्रीमत् भगवद्गीता पठण होणार आहे. सायंकाळी साडेचार वाजता गीता जयंती उत्सव-पारितोषिक वितरण समारंभ होणार असून, या वेळी विजेत्या स्पर्धकाला गौरवण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी व्यवस्थापक, गीता मंडळ, खारेघाट रोड रत्नागिरी येथे संपर्क साधावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 PM 28/Nov/2024