श्रृंगारतळी : दररोज अनेक रस्ते अपघात होतात. त्यामधील बहुसंख्य अपघात वाहनचालकांना रात्री अंधारात रस्त्यातील गुरे न दिसल्यामुळे झालेले आहेत. या घटनांमध्ये वाहनचालकांसह गुरेही जायबंदी होतात. हे प्रकार टाळण्यासाठी उनाड गुरांच्या गळ्यात रेडियम बेल्ट बांधण्याचा उपक्रम पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने हाती घेतला आहे. आतापर्यंत १५ मोकाट गुरांच्या गळ्यात रेडियम बेल्ट बांधण्यात पाटपन्हाळे ग्रामपंचायतीला यश आले आहे. अजूनही मोकाट असलेल्या गुरांना रेडीयम बेल्ट बांधण्यात येणार असल्याचे सरपंच विजय तेलगडे, उपसरपंच असीम साल्हे यांनी सांगितले.
श्रृंगारतळी बाजारपेठेसह ग्रामीण भागातही आजकाल मोकाट गुरांचा प्रश्न सतावत आहे. गुरांचे संगोपन करण्याऐवजी मालक त्यांना मोकाट सोडून देतात. त्यामुळे या मोकाट गुरांचे वास्तव्य बाजारपेठेत वाढलेले आहे. गुरांचे कळप रस्त्यावर ठाण मांडून बसतात. त्यामुळे अनेकदा वाहन अपघातांच्या घटना घडतात. रस्त्यावर फिरणारी मोकाट गुरे वाहनचालकांना रात्रीच्या अंधारात न दिसल्यामुळे त्यांना धडक बसते. त्यातून गुरे हकनाक बळी पडतात. अनेकदा माणसांच्याही जीवाला धोका होतो. हे टाळण्यासाठी पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच विजय तेलगडे, उपसरपंच असीम साल्हे, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावातील तरुणांच्या सहकार्यातून रेडियम बेल्ट बांधण्यात येत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:18 PM 28/Nov/2024














