रत्नागिरी : जिल्ह्यात लोटे, चिपळूणमधील गणपोली तसेच रत्नागिरी मिरजोळे येथील अनेक कंपन्यांमध्ये परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणात कामे करत आहेत. ज्यांची नोंदणी सहाय्यक कामगार आयुक्त रत्नागिरीकडे तसेच स्थानिक पोलिस ठाण्यात करणे कायद्याने बंधनकारक आहे; पण जिल्ह्यातील अनेक कंपन्या या नियमांचे पालन करत नाहीत. रत्नागिरी जिल्ह्यात परप्रांतीयांची घुसखोरी वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी मनसेला खळ्ळखट्याक करावे लागेल, असे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना रत्नागिरी जिल्हा चिटणीस महेंद्र गुळेकर यांनी सांगितले.
मनसेतर्फे काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी माहिती दिली. परप्रांतीयांची माहिती जिल्हा प्रशासनाला देणे आवश्यक आहे जेणेकरून कोणतेही गुन्हे घडल्यास त्याचा नाहक त्रास स्थानिक जनतेला होणार नाही. गंभीर गुन्हा किंवा चोरी करून परप्रांतीय गावी पळून जातात. त्यांची कोणतीही माहिती नसल्यामुळे त्यांच्या शोधात पोलिस प्रशासनाला कसरत करावी लागते. ज्या कंपन्यांमध्ये आणि बांधकाम कंत्राटदार किंवा विकासकाकडे परप्रांतीय कामगार काम करत आहेत. त्यांनी त्यांची माहिती प्रशासनाला सादर केली पाहिजे. नोंद नसलेले कामगार आढळल्यास आंदोलन करावे लागेल, असे गुळेकर यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:36 PM 28/Nov/2024














