मालवण, सिंधुदुर्ग येथे भारतातील पहिली समुद्रतळ स्वच्छता मोहीम

सिंधुदुर्ग : सागरी परिसंस्थेचे जतन करण्याच्या हेतूने मालवण, सिंधुदुर्ग येथे भारतातील पहिली समुद्रतळ स्वच्छता मोहीम काल, बुधवारी (दि.२७) यशस्वीरीत्या पार पडली. ही मोहीम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एम.पी.सी.बी.), भारतीय मत्स्य सर्वेक्षण, मुंबई (एफ.एस.आय.-मुंबई), नीलक्रांती संस्था आणि युथ बीट फॉर एनव्हारमेंट यांच्या सहकार्याने सिंधुदूर्गच्या किनारपट्टी येथे आयोजित केली होती.

यावेळी समुद्रतळातून २५० किलोग्रॅमपेक्षा जास्त जैवविघटनशील नसलेला कचरा काढण्यात आला.

सागरी परिसंस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या प्लास्टिक प्रदूषण आणि इतर कचरा सामग्रीच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यावर या मोहिमेने लक्ष केंद्रित केले. स्कुबा डायव्हर्सच्या पथकांनी पाण्याच्या पृष्ठभागाखालील प्लास्टिक, मासेमारीच्या जाळ्या, बाटल्या आणि कालांतराने जमा झालेले इतर हानिकारक अवशेष गोळा केले. समृद्ध जैवविविधता आणि स्वच्छ किनाऱ्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्गमधील या सागरी परिसंस्थेचे संरक्षण करण्याच्या उपक्रमांमध्ये ही स्वच्छ्ता मोहीम अत्यंत महत्वाची आहे.

सागरी अधिवासांचे जतन करणे आणि प्लास्टिक प्रदूषणाच्या धोक्यांविषयी जागरूकता वाढवणे या दोन्हींच्या महत्त्वावर भर दिला तसेच यामुळे देशभरातील अनेक संस्थांना आणि संघटनांना प्रेरणा मिळेल , असे यावेळी बोलताना वनशक्ती चे दयानंद स्टॅलिन यांनी सांगितले.

या मोहिमेत अशोक कदम, रविंद्र मालवणकर, रोहित सावंत, जयवंत हजारे, प्रमोद माने, रविकिरण तोरसकर (नीलक्रांती संस्था), रुपेश प्रभू याच्यासह बाबी जोगी, श्रमिक मच्छीमार संघ, दादा वेंगुर्लेकर, मातृत्व आधार संस्था, सौरभ ताम्हणकर युथ फॉर बिट्स चारुशीला देवलकर, कु.मेगल, स्वाती पारकर, दर्शन वेंगुर्लेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:44 28-11-2024