कृषी अधिकाऱ्यांच्या प्रोत्साहनामुळेच नर्सरी व्यवसाय : विनोद प्रभूदेसाई

पावस : सुरुवातीपासून शिक्षणात रूची नव्हती त्यामुळे अकरावीमध्ये नापास झालो. त्यानंतर गाड्यांमध्ये आवड असल्याने चालक म्हणून काम करू लागलो मात्र त्यामध्ये म्हणावे तसे कामाचे समाधान मिळू शकले नाही त्यामुळे यापुढे कोणाकडे नोकरी न करता काहीतरी व्यवसाय करायचा निर्णय घेतला काजूची कलमे बांधण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांकडून प्रोत्साहन मिळाले त्यामाध्येच काहीतरी करण्याच्या उद्देशाने नर्सरीचा परवाना काढला, नर्सरी व्यवसाय करण्याची गती मिळाली आणि त्या व्यवसायात स्थिर झाल्याचे रत्नागिरी तालुक्यातील हरचिरी येथील महालक्ष्मी नर्सरीचे मालक प्रगत शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते विनोद प्रभूदेसाई यांनी सांगितले.

गोळय कट्टाच्या ६१ व्या कार्यक्रमात त्यांची मुलाखत अविनाश काळे यांनी घेतली आयुष्यात नोकरी करायची नाही. असे ठरवून गावी जाऊन शेती, बागायती सांभाळायचे ठरवले त्या वेळी रोजगार हमी योजने अंतर्गत शंभर टक्के अनुदानावर फळबाग लागवड योजना आणली होती. २०० वेंगुर्ला चार आणि सात जातीची झाडे लावली, बाकी नारळ, सुपारी, केळी आदी शेती पाहत होतो. मात्र त्यात वानर, माकडांचा उपद्रव त्यामुळे पुरेसे उत्पन्न मिळत नव्हते अनुदानाचे पैसे अडकले होते. एक दिवस कृषी अधिकारी केळकर यांनी काजू, झाडाची कलमे बांधण्यासाठी स्टिक मिळतील का? असे विचारले माणसे पाठवली कशा स्टिक काढायच्या शिकवले या वेळी हजार स्टिकचे दोन हजार रुपये मिळाले. त्यानंतर कृषी कार्यालयाला लागणाऱ्या हजारो स्टिक विकल्या. केळकर यांनी कलमे बांधण्यासाठी प्रोत्साहन दिले. शिकवण्याची व्यवस्था केली. मी स्वतः कलमे बांधू लागलो. त्यांच्यामुळेच नर्सरीचा परवाना मिळाला. कर्ज घेऊन थोडी जागा घेऊन नर्सरी व्यवसाय वाढवला. आमच्याकडे येण्यासाठी मध्ये नाला होता. त्यावर पूल नव्हता खूप वाहतूक करावी लागायची मजुरांचे प्रश्न, वाढती मजुरी, विविध रोग, कतमे मरण्याची समस्या, विक्री अशा विविध अडवणी होत्या. त्यावर मात करत राहिलो, केळकर यांनी अन्य नर्सरी पाहण्याचा सल्ला दिला सुरवातीला आजूबाजूच्या सगळ्या नर्सरी फिरलो. तिथून ज्ञान मिळवत राहिलो, आता राज्यात, देशात आणि राष्ट्रीय नर्सरी संघटना सदस्य असल्याने परदेशातील नर्सरी उद्योग आणि तंत्रज्ञान पाहण्यासाठी फिरतो. सध्या देशी-विदेशी दीडशे प्रकारच्या झाडांची सुमारे लाखभर कलमे पाच राज्यात विकतो, व्यवहारात गुणवता आणि सचोटी सांभाळतो. आमच्या इथे नर्सरी, लागवडाविषयक मोफत सल्ला देतो. गावात दारूमुळे कायम भांडणे असायची त्यामुल मजूर मिळण्यावर परिणाम होत होता. लोकांच्या सांगण्यावरून गावातील भांडण्यात मध्यस्थी करून लोकांचे संबंध सुधारले दारूबंदी केली. लोकांची छोटी-मोठी कार्यालयातील अडकलेली कामे करू लागली. माझे सामाजिक काम पाहून शिवसेना नेते उदय बने यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहण्याचा सल्ला दिला होता पहिल्या वेळी पडलो. दुसऱ्या वेळी निवडून आल्यावर कामकाजात चमक दाखवली त्यामुळे सरपंचपदाची संधी मिळाली सध्या राजकारणातून निवृत्ती घेतली आहे, असेही प्रभुदेसाई यांनी सांगितले.

तरुण गावातच राहण्यासाठी प्रयत्न
भविष्यात नर्सरी आधुनिक तंत्रज्ञान टिश्यू कल्चर दुर्लक्षित फळांना मूल्यवर्धित करून बाजारपेठ मिळवणे, आपल्या भागातील तरुण गावातून शेती, व्यावसाय करून गावातच कसा राहील यासाठी प्रयत्न करत राहणे आदी भविष्यातील योजना आहेत, नर्सरी आणि शेतकरी म्हणून शासनाचे शेतीनिष्ठ शेतकरीसारखे अनेक पुरस्कार मिळाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:03 PM 28/Nov/2024