रत्नागिरी : जिल्ह्यात थंडी वाढली

दापोलीत पारा ९.९ अंशावर

रत्नागिरी : जिल्ह्यात हळूहळू थंडीचा कडाका वाढत आहे. दापेली तालुक्याचा पारा घसरला असून, गुरुवारी कमाल तापमान ९.९ अंश नोंदवले गेले. गुलाबी व बोचऱ्या थंडीमुळे आता पहाटे व सायंकाळी शहरासह ग्रामीण भागातील जीवनशैली बदलली आहे. उबदार कपड्यांना मागणी वाढली असून, हिवाळ्यात व्यायाम करणे चांगले असल्याने पहाटे फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळं राज्यावरही त्याचे परिणाम होताना दिसत आहेत. ऑक्टोबर हिटमुळ जिल्ह्याचे तापमान वाढले होते.

अवकाळी पावसामुळे थंडीचे आगमनही लांबणीवर पडले होते. कडक्याच्या उन्हामुळे अंगाची लाही लाही होत होती. परंतु आता गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान घसरले आहे. तापमानात घसरण झाल्यामुळे उन्हाच्या कडाक्यातून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गुरुवारी रत्नागिरीचे कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस तर किमान तापमानात मात्र रात्रीच्यावेळी चांगलीच घट दिसून येत आहे. किमान तापमान १८ अंश सेल्सअस नोंदवले गेले. जिल्ह्यात सर्वाधिक दापोली तालुक्यात तापमानात घसरण झाली असून, पारा ९.९ अंशापर्यंत घसरला आहे. मागील आठवड्यापासून जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडू लागली आहे. सकाळी हलक्या धुक्याचे साम्राज्य पसरत असल्याने नागरिकांचा दिवस उशिराने सुरु होत आहे. वाढत्या थंडीमुळे बाजारात उबदार कपड्यांना मागणी वाढली आहे. शहरातील बाजारात कानटोपी, मफलर, स्वेटर, जॅकेट विक्रीची दुकानेही थाटली आहेत. उबदार कपड्यांमध्येही आता फॅशनचे कपडे असून, त्याला तरुणांची चांगलीच पसंती आहे. २०० रुपयापासून तर एक हजार रुपयापर्यंत विविध प्रकारचे रंगबिरंगी, डिझाईनचे आकर्षक स्वेटर विक्रीसाठी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा ते पंधरा टक्क्यांनी उबदार कपड्यांच्या दरांमध्ये वाढ झाली असली तरी मागणीही कायम आहे. सध्या जिल्ह्यात सर्वत्र थंडीचा कडाका वाढला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तरेकडून थंड वारे सुरू झाले असून, येत्या काही दिवसात तसेच डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला तापमानात आणखी घट होऊन थंडी वाढू शकते.

तापमानाचा पारा खाली आल्याने सर्व वयोगटांमध्ये कफ, खोकला, सर्दी, ताप, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे दिसत आहेत. हिवाळ्याला सुरुवात झाल्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. -डॉ. अभिजीत देसाई रत्नागिरी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 AM 29/Nov/2024