ज्ञान संकलन आणि प्रसारण ग्रंथालयांचे मुख्य कार्य : सूर ग्रंथालय मित्र मंडळ

चिपळूण : आगामी काळात पुस्तकांचा संग्रह आणि त्यांची देवघेव करण्याचे ठिकाण एवढेच कार्य करून ग्रंथालयांना पुरेसे ठरणार नाही तर विविध विद्याशाखांचा पाठपुरावा करून वेगवेगळी माध्यमे वापरावी लागतील. ज्ञान संकलन आणि ज्ञान प्रसारण हे ग्रंथालयांचे मुख्य कार्य असले पाहिजे, असा सूर ग्रंथालय मित्र मंडळाने चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात आयोजित केलेल्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. बदलत्या काळानुसार ग्रंथालयांना सांस्कृतिक केंद्राचे नवे आणि विस्तारित रूप घ्यावे लागेल असा विचार या चर्चेत मांडण्यात आला.

लेखक आणि विविध विषयांचे तज्ज्ञ व्यावसायिक डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. ग्रंथालय मित्र मंडळाचे प्रवर्तक सुधीर बडे आणि ‘व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन’चे संचालक गिरीश घाटे चर्चासत्र यांनी प्रास्ताविक केले. वाचन कमी झाले असून, ते पुढील काळात आणखी घटणार आहे. केवळ छांदिष्ट लोक वाचत राहतील. त्यामुळे ग्रंथालयांचा लोकाश्रय कमी होणार हे स्वाभाविक आहे. म्हणूनच या टप्प्यावर ग्रंथालयांनी त्यांची भूमिका जाणावी आणि कार्यविस्तार करावा, असे बड़े व घाटे यांनी सांगितले.

दातार, बेहेरे, जोशी महाविद्यालयाचे प्राचार्य माधव बापट यांनी अध्यक्षीय समारोप केला. मेळाव्यास चिपळूण व जवळच्या तालुक्यांतील ग्रंथालयांचे पदाधिकारी, ग्रंथपाल आणि लेखक-प्राध्यापक उपस्थित होते. ‘ग्रंथालय मित्र मंडळा’च्या गावोगावी मेळावे घेण्याच्या मोहिमेचे अध्यक्ष डॉ. रविन थत्ते यांच्या संदेशाचे वाचन मनीषा दामले यांनी केले. गजानन केशव जोशी, नारकर, प्राची जोशी, विनिता नातू, राजकुमार सावंत, अरुण इंगवले, गोराडे, राष्ट्रपाल सावंत, सुहास बारटक्के, कैसर देसाई, विवेक कदम, मनोज गोगटे, डॉ. रत्नाकर सीताराम थत्ते आणि ज्येष्ठ पत्रकार, ग्रंथालीचे संस्थापक सदस्य दिनकर गांगलआदी चर्चेत सहभागी झाले होते. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश देशपांडे यांनी समारोप केला.

गावोगावी ग्रंथालय मित्र मंडळे तयार करावीत
सुधीर बडे यांनी गावोगावी ‘ग्रंथालय मित्र मंडळे’ कशी बनवता येतील याबाबत माहिती दिली. गावातील इच्छुक लोकांनी एकत्र येऊन मंडळ बनवावे. ते रजिस्टर करावे. अशा गावोगावच्या नोंदणीकृत ग्रंथालयांना नेटवर्कने जोडता येऊ शकेल. तो महाराष्ट्रव्यापी कार्यक्रम होईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 AM 29/Nov/2024