चिपळूण : चुरशीने निवडणूक झालेल्या चिपळूण विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांनी बाजी मारत दुसऱ्यांदा विजय मिळवला. या विजयात उद्धव सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी उघडउघड निकमांचा केलेला प्रचार व मतदानाचा परिणाम दिसून आला. या विषयावरून निवडणुकीनंतर उद्धव सेनेत अंतर्गत धुसफूस सुरू असून, फूट पडण्याची शक्यता आहे. चिपळुणात महाविकास आघाडीच्या चिंतन सभेत उद्धव सेनेचे तालुकाध्यक्ष विनोद झगडे यांनी गद्दारी करणाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले आहेत.
महायुतीचे उमेदवार आमदार निकम यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांचा साडेसात हजारांच्या मताधिक्याने पराभव केला. अडीच वर्षांपूर्वी आमदार निकम यांनी शरद पवार गटाला सोडून अजित पवारांच्या घडाळ्याची साथ धरली. पक्ष सोडल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. भाजपला धडा शिकवण्यासाठी येथील महाविकास आघाडीत विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते पेटून उठले होते. त्यांनी यादवांना निवडून आणण्याचा चंग बांधला होता; परंतु मतदानाच्या दिवशी नेमके उलटे चित्र पाहावयास मिळाले. ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेकांनी प्रत्यक्षात उघडपणे निकम यांचा प्रचार केला. निकम यांचे सर्व पक्षातील कार्यकर्त्यांशी चांगले संबंध आहेत. यातूनच उद्धव सेनेतील काही कार्यकर्ते त्यांच्याशी जोडले गेले. त्यात विविध ठिकाणी झालेल्या विकासकामांचा त्या कार्यकर्त्यांवर प्रभाव पडला. त्यातून काही कार्यकत्यांनी निवडणुकीत निकम यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. पक्षातील वरिष्ठांचा विरोध झुगारून निकम यांचा उघड उघड प्रचार केला. परिणामी, निकम यांचा विजय झाला. निवडणूक निकालानंतर मतांची आकडेवारी न्याहाळताना कोणी कोणी विरोधात काम केले, त्याचा अंदाज घेतला जात आहे. त्या अनुषंगाने पक्ष संघटनेंतर्गत पडसाद उमटू लागले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 29/Nov/2024














