रत्नागिरी : नाचणेतील नारायणमळीमध्ये कांदळवन सफर

रत्नागिरी : ‘कांदळवन कक्ष’ आणि ‘कांदळवन प्रतिष्ठाना च्या सहकायनि तालुक्यातील नाचणे-नारायणमळी येथे सुरु केलेल्या कांदळवन सफर, पक्षीनिरीक्षण आणि कयाकिंगला स्थानिकांसह कोल्हापूरच्या पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नाचणेबरोबरच पावस येथेही याच पद्धतीने प्रकल्प सुरु केला आहे.

वन विभागाच्या कांदळवन संरक्षण व उपजिविका निर्माण योजनेंतर्गत कोकणातील किनारी भागामध्ये निसर्ग पर्यटन व उपजिवीका निर्मितीचे अनेक प्रकल्प सुरू आहेत. यामधील निसर्ग पर्यटन उपक्रमांतर्गत पावस आणि नाचणे गावात कांदळवन निसर्ग पर्यटनाला सुरुवात करण्यात आली आहे. या गावांमध्ये कांदळवन सहव्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांमार्फत खाडीकिनारी असलेल्या कांदळवनांमधून स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून दिला जातो.

काजळी नदीवर कांदळवन पर्यटन प्रकल्प सुरु करण्यात आला. यामध्ये कांदळवन सफारीबरोबरच कयाकिंग देखील करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी वन विभागाने बोटीसह दोन कयाक दिले आहेत. कयावर दोन व्यक्ती बसू शकतात. बोटीमध्ये एकावेळी आठजणं सफर करतात. कांदळवनावर आधारित निसर्ग पर्यटनासाठी गावातील ग्रामस्थांना प्रशिक्षण दिले गेले आहे. हा प्रकल्प मे महिन्यात सुरु केला गेला. पावसाळ्यातील चार महिने पर्यटन बंद होते. दिवाळीनंतर पुन्हा पर्यटन प्रकल्प सुरु झाला असून, आतापर्यंत २० जणांनी याचा आनंद घेतला आहे. सुरुवात चांगली झाली असून, प्रचार-प्रसारही करण्यासाठी कांदळवन कक्षाकडून पावले उचलली जात आहेत. नाचणेबरोबरच पावसमधील भाटीवाडी येथे ‘गौतमी कांदळवन पर्यटन प्रकल्प’ सुरू करण्यात आला आहे. तेथेही पर्यटकांना कांदळवन अभ्यास फेरी, कांदळवन नौका सफारी, पक्षी निरीक्षण करता येते.

सध्या थंडी चांगल्याप्रकारे पडत आहे, त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी कांदळवन परिसरात बगळे, तितर, घार यासह अनेक पक्षी दिसतात. खाडीच्या पाण्यातील मासे पकडण्याचा घारीचा थरार कॅमेराबद्ध करण्यासाठीही पर्यटक येत आहेत. – दीपक गझने, कांदळवन गट प्रमुख

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:56 AM 29/Nov/2024