रत्नागिरी : फावल्या वेळेत बांबूपासून सूप, रोवळी, परडी विणणाऱ्या रत्नागिरीतील महिलेने दीड किलो चांदीपासून रोवळी तयार करण्याचे आव्हान पेलले. चक्क सहा तासांत ही रोवळी तयार केली. आकांक्षा दिलीप कांबळे असे या महिलेचे नाव आहे. ही रोवळी येत्या दत्त जयंतीला मुंबईतील मेस्त्री कुटुंबीयांकडून दत्त मंदिरात अर्पण केली जाणार आहे.
मेस्त्री कुटुंबाने दत्त जयंतीनिमित दत्ताच्या देवळात चांदीच्या रोवळीतून दिवा दाखवायचा असे ठरवले. त्याकरिता मेस्त्री कुटुंबाने सोनारांची दुकाने पालथी घातली; मात्र अशा प्रकारचे काम कोणतेही सोनार घेत नसल्याने त्यांच्या पदरी निराशा आली. रत्नागिरी शहरातील बुरूडकाम कारागिरांनी चांदीची रोवळी आम्हाला जमणार नाही, असे सांगितले. शहरापासून जवळच शिरगाव-बौद्धवाडी येथील आकांक्षा दिलीप कांबळे हे काम करू शकतात, अशी माहिती मिळाली.
त्यानुसार मेस्त्री शिरगाव, बौद्धवाडीत पोहोचले. त्यांनी कांबळे यांना रोवळी कशी हवी, ते सांगितले. कांबळे या शिरगाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात मदतनीस आहेत तसेच जिल्हा महिला परिचर संघटनेच्या त्या अध्यक्षा आहेत. फावल्या वेळेत त्या बुरूडकाम करतात; मात्र चांदीची रोवळी विणण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. सासूबाई सुनीता कांबळे, पती दिलीप आणि मुलगा वंश यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे त्यांनी हे आव्हान स्वीकारायचे ठरवले. त्यानुसार चांदाच्या पट्ट्यांची पूजा करून त्या विणायला सुरवात केली. सलग सहा तासानंतर म्हणजेच संध्याकाळी साडेपाचला त्यांनी सुबक रोवळी तयार केली. ही रोवळी पाहून मेस्त्री कुटुंबीयही खुश झाले.
अशा पद्धतीची म्हणजे धातूपासून रोवळी मी प्रथमच बनवली स्वतःच स्वतः ला आव्हान दिले आणि ते पूर्ण करू शकले, याचे समाधान मता आहे. अशा प्रकारची पुन्हा संधी आल्यास आपण असे शकतो, असा आत्मविश्वास वाटतो. आकांक्षा कांबळे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 PM 29/Nov/2024














