नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या 18 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर 5 ऑक्टोबरला वर्ग होईल. पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या 18 व्या हप्त्याचं वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते केलं जाईल.
18 व्या खात्याची रक्कम येत्या 5 ऑक्टोबरला जारी करण्यात येणार असल्यासंदर्भातील माहिती पीएम किसानच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. मात्र, पीएम किसानच्या 18 व्या हप्त्याची रक्कम नेमक्या कोणत्या राज्यात कार्यक्रम आयोजित करुन वर्ग केली जाणार यासंदर्भातील समोर आलेली नाही.
पीएम किसान सन्मान योजनेचा 18 हप्ता शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरला मिळणार आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना 17 हप्त्यांची रक्कम देण्यात आलेली आहे. केंद्र सरकारनं ही योजना 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केली होती. दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हप्त्यात 6 हजार रुपये पाठवले जातात. जून महिन्यात 17 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आली होती. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये 18 व्या हप्त्याची रक्कम कधी याची उत्सुकता लागून राहिलेली होती.
शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेतर्फे आतापर्यंत 17 हप्त्यांचे 34 हजार रुपये मिळाले आहेत. रब्बी हंगामातील पिकांची पेरणी आणि खरीप हंगामाच्या सुगीची काम सुरु असताना शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांची रक्कम जमा होणार आहे.
ईकेवायसी आवश्यक
शेतकऱ्यांना पीएम किसानचे पैसे मिळवण्यासाठी तीन कामं करावी लागणार आहेत. पीएम किसान सन्मान योजनेच्या 18 व्या हप्त्याची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी करणं आवश्यक आहे. पीएम किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटवर भेट देऊन मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक नोंदवून ई केवायसी पूर्ण करता येईल. याशिवाय शेतकऱ्याचं आधार कार्ड आणि बँक खातं लिंक असणं आवश्यक आहे.
पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावं?
स्टेप 1: पीएम किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटवर www.pmkisan.gov.in या वेबसाईटला भेट द्या, नवीन नोंदणी पर्यायावर क्लिकरुन भाषा निवडा.
स्टेप 2: शहरी क्षेत्रातील शेतकरी असल्यास अर्बन आणि ग्रामीण भागातील शेतकरी असल्यास रुरल पर्याय निवडून नोंदणी करा.
स्टेप 3: आधार नंबर, फोन नंबर आणि राज्य निवडा, तुमच्या जमिनीची माहिती भरा.
स्टेप 4: जमिनीशी संदर्भात कागदपत्रं अपलोड करा. यानंतर कॅप्चा कोड नोंदवा, त्यानंतर गेट ओटीपी क्लिक करुन ओटीपी भरुन अर्ज सादर करा.
दरम्यान, पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नसल्यास ती पूर्ण करुन घ्यावी. केवायसी अपूर्ण असणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:04 26-09-2024