चिपळूण : विधानसभा निवडणुकीतील पराभवाने खचलेलो नाही, तुम्हीही खचू नका. ९० हजार लोकांनी आपल्याला पसंती दिली हीच तुमची आणि माझी कमाई आहे. माझ्यासाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, संघर्ष केला त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. विचारांची लढाई आपण ताकदीने लढलो. त्यामुळे पराभवाची चिंता न करता मी मैदानात उतरलोय. तुम्हीही कामाला लागा, पुन्हा लढणार आणि जिंकणार, असा आशावाद राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस आणि महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार प्रशांत यादव यांनी आभार मेळाव्यात व्यक्त केला.
चिपळूण विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांचा पराभव झाला. त्यानंतर गुरूवारी त्यांनी शहरातील अतिथी सभागृहात आभार मेळावा घेतला. श्री. यादव म्हणाले, काही दिवसात या मतदार संघात जबरदस्त वातावरण तयार केले. अनेक अडचणी होत्या. त्यात मी नवखा होतो. समोर सत्ता, संपत्ती आणि हजारो कोटींच्या कामांचा दावा, त्यामुळे सत्ता संपत्तीविरोधात सामान्य जनता अशी ही लढाई होती. कार्यकर्ते निकराने लढल्याने विरोधकांना घाम फुटला होता. कुठे काय चुकले, कुठे कमी पडलो याचे आत्मचिंतन आपण करू; पण ज्याप्रमाणे तुम्ही जीवाचे रान केलेत आणि अभूतपूर्व लढा दिलात त्याबद्दल ऋणी आहे.
या वेळी माजी आमदार रमेश कदम, काँग्रेस तालुकाध्यक्ष लियाकत शहा, शिवसेना तालुकाप्रमुख विनोद झगडे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, बळीराम शिंदे, स्वप्ना यादव, शहराध्यक्ष रतन पवार, शिवसेना शहरप्रमुख शशिकांत मोदी, राकेश शिंदे, सतीश खेडेकर आदी उपस्थित होते.
पुढील निवडणुका एकत्र लढू
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी आजपासूनच कामाला लागा. वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल तो होईल; पण येथे आपण एकत्र येऊन लढायचे आहे. मी तुमच्यापाठी ठाम उभा आहे. आता आलेले अपयश हे पुढील विजयाचे संकेत आहेत. आगामी काळात काहीजण सत्तेच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. याची कल्पना मला पूर्वीच आली होती; पण तुमच्यासारखे कडवट कार्यकर्ते माझ्याबरोबर असल्याने चिंता करणार नाही, असेही यादव यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 PM 29/Nov/2024














