मुंबई : महाराष्ट्रातील रत्नागिरी येथील प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्प तथा रिफायनरी गुजरात अथवा आंध्र प्रदेशला जाण्याची शक्यता असून या दोन्ही राज्यांत प्रत्येकी एक प्रकल्प उभारण्याचा विचार केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू आहे.
महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा विचार होता. मात्र स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधामुळे जमीन हस्तांतरावरून वाद सुरू झाल्यानंतर गुजरात आणि आंध्र प्रदेशात प्रत्येकी एक प्रकल्प उभारण्याच्या वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. केंद्रात सरकार स्थापन करताना मोदी सरकारने आंध्रात एक रिफायनरी देण्याचे आश्वासन तेथील मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंना दिले होते. त्यामुळे एक तर रत्नागिरीची रिफायनरी गुजरातला जाईल किंवा ती आंध्रात हलवण्यात येईल आणि दुसरी रिफायनरी यापैकीच एका ठिकाणी उभारली जाईल. गुजरातमधील प्रकल्प ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) आणि सौदी अरामको यांच्या भागीदारीत होईल. तर, आंध्र प्रदेशातील प्रकल्प भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (बीपीसीएल) सहयोगाने होईल. प्रत्येक तेलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमतचा एक ते दीड कोटी टनांची असेल.
पुढील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाच्या नेत्यांची बैठक होत असून. त्यात सौदी अरेबियाची भारतातील गुंतवणूक वाढावी, यासाठी चर्चा केली जाणार आहे. यापूर्वी सौदी अरेबियाने भारतात रेल्वे, पोर्ट्स आणि जल वाहतूक क्षेत्रात १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अपेक्षेपेक्षा गुंतवणुकीचा वेग कमी आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा होईल. गुजरातमध्ये तेलशुद्धीकरण प्रकल्प झाल्यास तो जामनगर अथवा वडोदरात होईल. संबंधित प्रस्ताव अजूनही चर्चेच्या पातळीवर आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पांना काही वेळ लागेल. कारण, पुढे जाण्यापूर्वी सर्वबाजूंनी विचार केला जाईल. कदाचित, इतर किफायतशीर प्रस्ताव पुढे येऊन त्यालाही वेग येऊ शकेल, असे काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सौदी अरेबिया देखील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सुधारित द्विपक्षीय करार करण्याचा विचार करत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 PM 29/Nov/2024














