संगमेश्वर : आरवली-माखजन रस्त्याची बिकट अवस्था

माखजन : संगमेश्वर तालुक्यातील मुंबई- गोवा महामार्गावरुन आरवली ते माखजनला जाणाऱ्या १० किलोमीटर रस्त्याची सध्या बिकट अवस्था झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तर सरंद येथे गुरव वाडी व माखजन इंग्लिश स्कूल येथे सार्वजनिक बांधकाम विभागाने सोडलेले अर्धवट काम यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

सरंद येथे माखजन इंग्लिश स्कूल येथे व सरंद गुरव वाडी येथे रस्त्याची उंची वाढवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले. अर्धा रस्ता पूर्ण करुन काम अर्धवट सोडून दिले. एकूणच या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे दुचाकीस्वार पडण्याचे प्रमाण वाढले आहे. रात्रीचे वेळी या अर्धवट कामाचा अंदाज येत नसल्याने अपघात होत आहेत. धुक्यामुळे हे अर्धवट काम कळून येत नसल्याने दुचाकीस्वार व मोठ्या गाड्यांचेही अपघात होत आहेत. हे दोन्ही अर्धवट सोडलेल्या रस्त्यांच्याच परिसरात माखजन इंग्लिश स्कूल, सरंद मराठी शाळा येतात. त्यामुळे याठिकाणी विद्यार्थ्यांची रहदारी असते. याचा त्रास विद्यार्थ्यांना देखील सहन करावा लागत आहे.

आमदार शेखर निकम यांनी केलेल्या विकास कामाच्या मुद्यावर निवडणूक लढवली. परंतु आरवली माखजन या मुख्य रस्त्याची झालेली दुरवस्था व गेल्या सात महिन्यांपासून अर्धवट सोडलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम यांच्याकडे आमदार शेखर निकम यांचेही दुर्लक्ष झाल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

या रस्त्याची एकूणच झालेली दुरवस्था माखजन पंचक्रोशीसाठी तापदायक झाली आहे. आरवली माखजन रस्ता हा पंचक्रोशीच्या दृष्टीने महत्त्वाचा असून याच रस्त्याकडे कुणीही लक्ष देत नसल्याने, येथील प्रवाशांना व नागरिकांना कुणी रस्ता करता, का रस्ता? अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 PM 29/Nov/2024