रत्नागिरी : जिल्हा परिषदेचे ७० विद्यार्थी जाणार नासा, इस्त्रो सफरीवर

रत्नागिरी : जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांमधून शास्त्रज्ञ घडावा यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाच्या गुणवत्ता कक्षाने नासा, इस्त्रो सफर हा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. यंदाही ७० मुलांना हा अनुभव घेता येणार आहे. याची निवड प्रक्रिया येत्या काही दिवसात सुरू होणार असून, जिल्हा नियोजनमधून २ कोटी ४० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ आणि अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ सफर घडवली जाणार आहे. मागील दोन वर्षात या संस्थांना विद्यार्थ्यांनी भेट दिली होती. पहिल्या वर्षी २७ विद्यार्थी इस्त्रोला आणि ९ विद्यार्थी नासाला गेले होते. येत्या नवीन वर्षात या दोन्ही संस्थांना भेट देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन स्तरावरून नियोजन सुरू झालेले आहे. नासा दौऱ्यासाठी १ कोटी ९५ लाख तर इस्त्रोसाठी ४० लाख तरतूद करण्यात आलेली आहे. चाळणी परीक्षेनंतर विद्यार्थी निवड केली जाणार आहे. आतापर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यांनी पुस्तकातच वैज्ञानिक गोष्टी वाचल्या होत्या; पण या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नासा आणि इस्त्रो या अंतराळ संशोधन संस्था प्रत्यक्ष पाहायला मिळत आहेत. तिथे केले जाणारे संशोधन, अंतराळातील परिस्थिती यांसह अॅस्ट्रोनॉट यांच्याशी संवाद साधता येतो. त्यामुळे विद्यार्थी खूपच आनंदी झाले होते. आतापर्यंत सलग दोन वर्षे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अंतराळविषयक माहिती घेता आली होती. हा प्रकल्प कायमस्वरूपी सुरू राहावा यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. यादव यांच्यासह प्राथमिक शिक्षण विभागाने प्रयत्न केले होते. त्याला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

केंद्रस्तरावर चाळणी परीक्षा
नासा व इस्रो भेटीसाठी शिक्षण विभागाकडून केंद्रस्तरावर विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यातून विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली जाईल. मागील वर्षी २५१ केंद्रांवर २० हजार ५११ विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा घेतली होती. त्यामधून ७० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यातील २० मुले नासा व ५० इस्रोसाठी निवडले गेले होते. यंदाही २० मुले नासासाठी तर ५० मुले इस्त्रोसाठी निवडण्यात येणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:07 PM 29/Nov/2024