खेड : वेरळनजीक सर्व्हिस रोडचे काम संथगतीने

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील खवटीपासून परशुराम घाटापर्यंतच्या चौपदरीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला तरी सर्व्हिस रोडचे काम रखडलेलेच आहे. वेरळ येथील हॉटेल गणपती कृपासमोरील सर्व्हिस रोडचे काम संथगतीनेच सुरू आहे. या कामामुळे चौपदरीकरणातील एकाच मार्गावरून वाहतूक सुरू आहे. या ठिकाणी छोटेखानी पुलाच्या उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे कामही धीम्या गतीने सुरू असून, काम पूर्ण होणार कधी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील खवटीपासून परशुराम घाटापर्यंतच्या चौपदरीकरणामुळे वाहनचालकांचा प्रवास वेगवान झाला आहे. एकीकडे वाहनचालकांचा प्रवास सुसाट झालेला असतानाच दुसरीकडे मात्र सर्व्हिस रोडअभावी महामार्गावरील त्या त्या ठिकाणी ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांची कोंडी झाली आहे. ग्रामस्थांच्या सततच्या रेट्यानंतर सर्व्हिस रोडची कामे हाती घेण्यात आली होती; मात्र या कामांना गती नसल्याने पादचाऱ्यांसह वाहनचालक त्रस्त झाले आहेत. प्रसंगी वळसा मारून इच्छितस्थळ गाठावे लागत आहे. तालुक्यातील वेरळ येथील हॉटेल गणपती कृपासमोरील सव्र्हिस रोडचे काम सुरू आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या कामाला अद्यापही गती मिळालेली नाही. रडतखडत सुरू असलेल्या या कामामुळे वाहनचालकांना एकेरी मार्गावरूनच ये-जा करावी लागत आहे. याच ठिकाणी छोट्या पुलाची उभारणीदेखील करण्यात येत आहे. हे कामदेखील धीम्या गतीने सुरू असल्याने वाहनचालकांना एकेरी मार्गाचाच अवलंब करावा लागत आहे.

या कामांसाठी ठेकाधारक कंपनीने कुठल्याही प्रकारे सूचनाफलकांचा अवलंब केलेला नाही. यामुळे एकेरी मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांची फसगत होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:21 PM 29/Nov/2024