खेड : कशेडी घाटातून वाहनचालकांचा जीवघेणा प्रवास

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातील वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्याने घाटातून वाहतूक वळवण्यात आली आहे. कशेडी घाटातील मार्गासह कशेडी बंगला मार्गाची दयनीय अवस्था झाली असून, वाहनचालकांची कसरत सुरू आहे. खड्डेमय रस्त्यासह धुळीच्या साम्राज्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. बोगद्यातील वाहतूक बंद झाल्यापासून घाटातून मार्गस्थ होणाऱ्या वाहनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. या मार्गावरून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. कशेडी बोगद्यातील दोन्ही बाजूकडील वाहतूक सुरू झाल्यापासून सर्वच वाहने बोगद्यातूनच मार्गस्थ होत आहेत. यापूर्वी बोगद्यातून अवजड वाहतुकीच्या वाहनांना बंदी घालण्यात आली होती; मात्र त्यानंतर बोगद्यातूनच अवजड वाहनेदेखील मार्गस्थ होत होती.

यामुळे कशेडी घाटातील मार्गाच्या दुरुस्तीकडे राष्ट्रीय महामार्ग खात्याने जाणीवपूर्वक दुर्लक्षच केले होते. या दुर्लक्षामुळे घाटातील रस्त्याची दैनावस्थाच झाली आहे. या मार्गावरून काही मोजक्याच एसटी बसेस धावत होत्या. गेल्या पाच दिवसांपासून बोगद्यातील बंद केलेल्या वाहतुकीमुळे कशेडी घाटातूनच वाहतूक सुरू आहे. आधीच कशेडी घाटातील मार्गाची दुरवस्था झाली आहे. त्यात आता सगळ्याच वाहनांची भर पडल्याने मार्गाची अवस्था आणखी बिकट झाली आहे. घाटातील मार्गावर जागोजागी पडलेल्या खड्यांमुळे वाहनचालकांचा जीव टांगणीवरच आहे. धुळीच्या साम्राज्यानेही वाहनचालक अक्षरशः मेटाकुटीस आले आहेत. धुळीमुळे वाहनचालकांना काहीही दिसत नसल्याने वाहने हाकताना कसरतच करावी लागत आहे. घाटातील खड्डेमय मार्ग सुस्थितीत आणण्यासाठी सहच मिळालेली नाही. मार्गावर निर्माण झालेला धुळीचा त्रास कमी करण्यासाठी टकरद्वारे पाणी मारण्याची तसदीदेखाल घेतली जात नाही. यामुळे वाहनचालकांसह पादचारी हैराण झाले आहेत.

कशेडी घाटातून प्रवास करत असताना उडणाऱ्या धुळीमुळे तसेच नादुरुस्त रस्त्यामुळे वाहने हाकताना खरोखरच कसरत करावी लागते. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग यांनी लक्ष देऊन तत्काळ दुरुस्ती करावी. संदीप शिरवले, वाहनचालक

महामार्गावरील कशेडी घाटातील रस्त्याचे डांबरीकरण आणि नादुरुस्त महारे यांची दुरुस्ती करण्यासाठी सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. येत्या फेब्रुवारी महिन्याअखेर हे काम पूर्ण होईल.- पंकज गोसावी, अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:35 PM 29/Nov/2024