राजापूर : तालुक्यातील कोंड्ये तर्फे सौंदळ पैकी खालचीवाडी येथील ग्रामस्थ माधव गजानन हर्डीकर यांच्या आंबा, काजू, नारळी, फोफळीच्या बागेत असलेल्या विहीरीत वन्यप्राणी रानगवा पडून मृत अवस्थेत आढळून आला. या रानगव्याला वनविभागाच्या रेस्कु टिमने विहीरीबाहेर काढून त्याची विल्हेवाट लावल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.
याबाबत माधव हर्डीकर यांनी वनपाल राजापूर यांना भ्रमणध्वनी वरून वन्यप्राणी रानगवा मृत आढळून आला असल्याचे कळविले. सदरची घटना परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना कळवून, त्यांचे समवेत वनपाल राजापूर, वनरक्षक राजापूर व रेस्क्यू टीमसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता माधव हर्डीकर यांच्या आंबा, काजू, नारळी, फोफळीच्या बागेत असलेल्या विहीरीत वन्यप्राणी रानगाव पडून मृत अवस्थेत असल्याचे दिसले. या रानगव्याला विहिरीत रस्सी टाकून जेसीबीच्या साहाय्याने विहिरीच्या बाहेर काढून सदर रानगव्याची शिकार किंवा विषबाधा झाली आहे काय याची खात्री पशुवैद्यकीय अधिकारी व वन अधिकारी यांनी केली. हा रानगवा हा नर जातीचा असून त्याचे वय दीड वर्ष असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी प्रभास किनरे यांचे मार्फत शवविच्छेदन केले असता, सदरचा गवा हा विहिरीतील पाण्यात पडून मृत्यू झाल्याचे पशुधन विकास अधिकारी राजापूर यांनी सांगितले. त्यानंतर विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीम. गिरिजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण श्रीम. प्रियांक लगड, वनक्षेत्रपाल रत्नागिरी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली गव्याला लाकडाची चिता रचून त्याला जाळून नष्ट केले.
या कामगिरीसाठी सहाय्यक वनसंरक्षक श्रीम. प्रियांका लगड चिपळूण रत्नागिरी, वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, वनपाल राजापूर जयराम बावदाणे, वनरक्षक राजापूर विक्रम कुंभार व रेस्क्यू टीमचे दीपक चव्हाण, विजय म्हादये, दीपक म्हादये, नितेश गुरव, संतोष चव्हाण, निलेश म्हादये उपस्थित होते. अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने श्रीमती गिरीजा देसाई विभागीय वनाधिकारी रत्नागिरी यांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:52 PM 29/Nov/2024














