खेड : खेड शहरात मोकाट कुत्र्यांचा वावर दिवसागणिक वाढत आहे. रहदारीच्या मार्गावर कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. या मुळे नगर प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून मोकाट कुत्र्यांना रोखण्यासाठी लवकरच निर्बिजीकरणाची मोहीम राबवण्यात येणार आहे.
उत्पत्ती नियंत्रणासह लसीकरणही केले जाणार आहे. शहरातील सर्वच भागांमध्ये मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. रहदारीच्या मार्गावरील कुत्र्यांच्या वावरामुळे वाहनचालकांसह पादचारी त्रस्त आहेत. सततच्या भुंकण्यानेही नागरिकांची झोपमोड होत होती. शहरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढलेला असतानाही नगर प्रशासनाने कार्यवाहीसाठी कुठलीच ठोस पावले उचलली नव्हती. प्रशासनाने मोकाट कुत्र्यांना रोखून नागरिकांना भयमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. लवकरच शहरातील उनाड, भटक्या कुत्र्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बिजीकरणाची मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या मोकाट कुत्र्यांची उत्पत्ती नियंत्रणात आणण्यावरही भर दिला जाणार आहे. तसेच कुत्र्यांसाठी लसीकरणाची मोहीमही राबवण्यात येणारं आहे. तशी निविदाही नगर परिषदेने काढली असून लवकरच अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने नगर प्रशासन पाऊल पुढे टाकणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:45 PM 29/Nov/2024














