मुंबई : राज्यात जर महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं आणि दोन दिवसात सरकार स्थापन नाही झालं तर राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मग आता 5 डिसेंबर रोजी शपथविधी होणार आहे, तोपर्यंत राज्य कुणाच्या भरवशावर ठेवण्यात आलं आहे असा सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
भाजपमध्ये एकही लाडकी बहीण मुख्यमंत्रिपदाच्या योग्यतेची नाही का असा सवालही त्यांनी विचारला.
काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
सुषमा अंधारे म्हणाल्या की, विजयाची शक्यता नसलेल्या शिंदे गटाच्या एका वाचाळवीर नेत्याने म्हटलं होतं की, जर 48 तासांममध्ये महाविकास आघाडीने सरकार स्थापन करू शकले नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते. त्याचवेळी आता सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री अजून ठरत नाही. आज असं कळतंय की मुख्यमत्रिपदाचा शपथविधी हा 5 डिसेंबर रोजी होणार आहे. मग भारतीय जनता पार्टी ज्या लाडक्या बहिणीचा गवगवा करतेय त्या लाडक्या बहिणींनी सत्तेमध्ये वाटा मिळणार का? लाडकी बहीण 1500 रुपयामध्ये आणि आख्खी तिजोरी ही लाडक्या भावाच्या हाती हे किती दिवस चालणार. या भारतीय जनता पक्षामध्ये एकही लाडकी बहीण नाही जी मुख्यमंत्रिपदाच्या योग्य नाही?
जर 5 डिसेंबर रोजी सरकारचा शपथविधी होणार असेल तर तोपर्यंत राज्य कुणाच्या भरवशावर राहील? असा प्रश्न यावेळी सुषमा अंधारे यांनी विचारला.
दरम्यान, राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा आझाद मैदानात पार पडणार असल्याची माहिती आहे. महायुतीचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी आझाद मैदानात होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती आहे.
तीन ते चार महिलांना मंत्रिपदं मिळणार
राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात महिलांची संख्या वाढणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यामध्ये चार महिलांना मंत्रिपदं मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामध्ये अदिती तटकरे, देवयानी फरांदे आणि श्वेता महालेंच्या नावाची चर्चा आहे.
मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती
गुरुवारी नवी दिल्लीत सत्तास्थापनेच्या विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानुसार आगामी मंत्रिमंडळात मंत्रिपदाचा फॉर्म्युला काय असेल असा सवाल निर्माण झाला आहे. एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार आगामी मंत्रिमंडळात भाजपचे 20 मंत्री दिसण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेचे 12 ते 13 आणि राष्ट्रवादीचे 9 ते 10 मंत्री दिसतील असा अंदाज आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर कोण बसणार? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी सगळ्यांचं लक्ष काल अमित शाहांच्या घरी पार पडलेल्या बैठकीकडे होतं. देवेंद्र फडणवीसच नवे बॉस असतील असं गल्लीपासून दिल्लीपर्यंत ठोस सांगितलं जातंय. मात्र अद्याप महायुतीकडून तशी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तसंच भाजप विधीमंडळ पक्षाची बैठक प्रलंबित आहे. ज्यात भाजप विधीमंडळ पक्षाचा नेता निवडला जाईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:40 29-11-2024