चिपळूण आगाराच्या कचऱ्याचे भोगाळे परिसरातील नाल्याजवळ डम्पिंग

चिपळूण : शहरातील भोगाळे या भर वर्दळीच्या भागात एका नाल्यानजीक मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा एका ट्रॅक्टरद्वारे टाकला जात असल्याची बाब उबाठा शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रामुख बाळा कदम यांच्या लक्षात आली. या समस्येबाबत आक्रमक झालेल्या कदम यांनी संबंधित प्लास्टिक कचरा टाकणाऱ्या ट्रॅक्टर चालकासह कचरा टाकणाऱ्या संबंधितांना शिवसेना स्टाईल इंगा दाखवून नगर परिषद प्रशासनाकडे संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.

हा सर्व कचरा चिपळूण एस.टी. आगाराकडून टाकला जात असल्याचे निष्पन्न झाले. भोगाळे या वर्दळीच्या परिसरात एस.टी. आगाराच्या बाजूला असलेल्या एका नाल्यानजीक मोकळी मात्र आरक्षित जागा आहे. ही जागा मिळालेल्या माहितीनुसार एस.टी. महामंडळाची असून गेली अनेक वर्षे या जागेत झाडेझुडपे वाढल्यामुळे दलदल निर्माण झाली आहे. महामंडळाच्या ताब्यात ही जागा असल्याने काल (दि. २९) सकाळच्या वेळेत चिपळूण आगार एसटी प्रशासनाकडून या जागेवर भरावाच्या नावाखाली बसस्थानक परिसरातून जमा झालेला प्लास्टिकचा कचरा ट्रॅक्टरच्या माध्यमातून डम्पिंग करण्याचे सुरू करण्यात आले होते. ही बाव उबाठा शिवसेना क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेऊन जोरदार हंगामा केला.

चिपळूण नगर परिषद प्रशासनाच्या आरोग्य प्रमुखांसह चिपळूण आगारातील प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलावून शिवसेना स्टाईल इंगा दाखविला. त्यामुळे काही काळ त्या ठिकाणी गोंधळ उडाला. यावेळी बाळा कदम यांनी न. प. प्रशासनाला सांगून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करा, गुन्हे दाखल करा, अशी मागणी केली.

यावेळी न. प. चे आरोग्य निरीक्षक महेश जाधव घटनास्थळी दाखल झाले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष बाळा कदम यांनी महेश जाधव यांना संबंधितांवर कायदेशिर गुन्हा दाखल करा. एकीकडे स्वच्छ भारत, स्वच्छ चिपळूण मोहीम राबविली जात असताना दुसरीकडे एसटीचे अधिकारी नाल्यानजीक टाकत आहे. हाच कचरा नाल्यातून नदीला मिळेल. याबाबत तीव्र नाराजी करीत हा कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी का टाकला नाही, असा सवाल अधिकाऱ्यांना केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 30/Nov/2024