चिपळूण : शहरातील रामतीर्थ स्मशानभूमी आवारात मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारती निष्कसीत करून त्या ठिकाणी नवीन इमारतीसह परिसराचे सुशोभिकरण व नूतनीकरण करावे, अशी मागणी एका निवेदनाद्वारे माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
मुकादम यांनी दिलेल्या पत्रानुसार, सुमारे वर्षाभरापूर्वी या संदर्भात नगर परिषदेला पत्र दिले होते. मात्र, आजपर्यंत त्या बाबत सकारात्मक व ठोस कार्यवाही झालेली नाही. शहरातील अनेक विकासकामांवर कोट्यावधी रुपये खर्च होत आहेत. मात्र, शहरातील महत्त्वाची स्मशानभूमी विकासापासून वंचित राहिली आहे. काही वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारती पूर्णपणे मोडकळीस आल्याने धोकादायक बनल्या आहेत. इमारतीमधील काही भाग कधीही कोसळू शकतो. त्या अंतर्गत श्रद्धांजली हॉल, लाकडाची वखार या इमारती शेवटची घटका मोजत आहेत. स्मशानभूमी देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
या ठिकाणी अनेक सुविधांचा अभाव आहे. त्यासाठी श्रद्धांजली हॉल, लाकडाची वखार, धार्मिक विधीकरिता आवश्यक सोयी व सुविधा, वॉशरूम, विद्युतीकरण, मुबलक पाणीपुरवठा, स्मशानभूमीच्या बाजूने संरक्षक रेलिंग, बैठक व्यवस्था तसेच स्मशानभूमी भागात कॉक्रिटीकरण असे काम करून परिसर सुशोभित करावा. याबाबत महिनाभरात सकारात्मक निर्णय न झाल्यास प्रतिकात्मक आंदोलन म्हणून स्मशानभूमी प्रवेशद्वाराजवळ कोणतीही पूर्वसूचना न देता उपोषण करण्यात येईल, असा इशारा मुकादम यांनी दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 PM 30/Nov/2024













