‘एनएसएस’ मधून सुसंस्कृत, जबाबदार नागरिक घडतात : प्रा. नामदेव तळप

चिपळूण : राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित केला जाणाऱ्या श्रमसंस्कार शिबिराच्या विविध उपक्रमांमधून विद्यार्थी स्वयंशिस्त, सामाजिक कार्य करण्याची संधी व प्रेरणा, वक्तशिरपणा, समाजाप्रती असलेले उत्तरदायित्व अशा अनेक गुणांनी समृद्ध होतात. असे सुजाण, सुसंस्कृत व जबाबदार नागरिक राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे घडविले जातात, असे मत डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. नामदेव तळप यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या मौजे चिंचघरी (गणेशवाडी) येथे होणाऱ्या ग्रामीण पुनर्रचना निवासी शिबिराच्या उ‌द्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

विकसित भारताचे स्वप्न साकारण्याची ताकद युवाशक्तीमध्ये असून राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक स्व-विकासातून समाजाचा व पर्यायाने देशाचा विकास साधण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यामुळे शिबिरात सहभागी होण्याची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांनी इतर प्रलोभनांपासून दूर राहत आयोजित केल्या जाणाऱ्या सर्व उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेत व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.

राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अरुण जाधव यांनी प्रास्ताविकपर मनोगतात शिबिराच्या आयोजनाचा हेतू स्पष्ट केला, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका स्नेहल कुलकर्णी यांनी शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी प्रत्येक उपक्रमात प्रामाणिकपणे सहभाग घेत शिबिरादरम्यान त्यांच्यामध्ये होत असलेल्या सकारात्मक बदलांचे आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले. चिंचघरी ग्रामपंचायतीचे सदस्य डॉ. राकेश चाळके यांनी त्यांच्या मनोगतात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे दरवर्षी आयोजित केली जाणारी शिबिरे जबाबदार नागरिक घडवत सामाजिक योगदान देत असल्याचे मत व्यक्त केले.

न. ए. सोसायटीचे सेक्रेटरी अतुल चितळे यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. माधव बापट यांनी विद्याथ्यांच्या जडणघडणीत राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे महत्त्व सांगितले. तसेच चिंचघरी ग्रामस्थांच्या सहकार्याबद्दल आभार मानले.

यावेळी चिंचघरी गावचे सरपंच राजेश चाळके, ग्रामपंचायत सदस्य अनिता गुरव, सुकाई देवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महेश चाळके, रमेश चाळके, पोलिस पाटील रोहन आग्रे, तंटामुक्ती अध्यक्ष दिनेश चाळके, अनिल कलकुटकी, प्रा. स्वप्निल साडविलकर, प्रा. विनायक बांद्रे, प्रा. प्रदीप वळवी, प्रा. मृण्मयी सोहोनी यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. माधवी जोशी यांनी तर प्रा. विठ्ठल कोकणी यांनी आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 PM 30/Nov/2024