रत्नागिरी : केवळ वेळापत्रकच नाही तर राज्य मंडळाच्या दहावी-बारावी परीक्षेसंबंधी आवश्यक माहिती, परिपत्रके व अनुषंगिक सुविधा यासाठी मंडळाने मोबाईल अॅप विकसित केले असून, बोर्ड परीक्षेची माहिती मिळवणे यामुळे सुलभ झाले आहे. विद्यार्थी- पालक, शाळा, कर्मचारी यांच्यासाठी अॅप उपयुक्त ठरणार आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये आयोजित करावयाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ. १२ वी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इ. १० वी परीक्षांची अंतिम वेळापत्रके राज्य मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर दि. २१ नोव्हेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या शिवाय चालू वर्षाच्या परीक्षेत गणित व विज्ञानाच्या तीव्रतेचा निकषात कोणताही बदल नसल्याचे मंडळाने पत्रकात म्हटले आहे.
मंडळामार्फत विद्यार्थी, शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांच्या सोईसाठी MSBSHSE ho-ndroid Mobile-pplication विकसित करण्यात आलेले असून ते Google Play Store Download करण्याकरता उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अॅपमध्ये मंडळामार्फत नुकतेच प्रसारित करण्यात आलेली इ. १० वी व इ.१२वी फेब्रुवारी मार्च २०२५ परीक्षेची वेळापत्रके, त्याचप्रमाणे विद्याथ्यांसाठी मार्च २०२४ परीक्षेच्या ठराविक विषयाच्या प्रश्नपत्रिका, तसेच विविध परिपत्रके शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना उपलब्ध होतील.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इ. १० वी परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांकरता मंडळाच्या प्रचलित पद्धतीप्रमाणेच उत्तीर्णतेचे निकष असणार आहेत. ज्या वर्षी या निकषात बदल होतील त्यावेळी मंडळामार्फत स्वतंत्ररित्या कळवण्यात येईल, याची नोंद सर्व शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक व अन्य संबंधीत घटक यांनी घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या बाबींची नोंद कार्यकक्षेतील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांनी घेऊन कार्यवाही करावी, अशा सूचना बोर्डामार्फत देण्यात आल्या आहेत. या अॅपसंदर्भात काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास गणकयंत्र विभाग, राज्य मंडळ, पुणे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही बोर्डामार्फत करण्यात आले आहे.
अशी आहेत अॅपची वैशिष्ट्ये…
अॅप गुगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध होणार आहे. विद्यार्थी शाळा व कर्मचाऱ्यांसाठी लॉगिन उपलब्ध होणार आहे. नमुना प्रश्नपत्रिका वेळापत्रक निकाल यासह अनुषंगिक बाबी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहेत. फी परतावा, अंतर्गत व प्रात्यक्षिक परीक्षा गुण यासह अनुषंगिक सुविधा शाळांसाठी उपलब्ध होणार आहेत. याशिवाय अन्य अद्ययावत सर्वसाधारण माहिती सर्वांसाठी लॉगिनशिवाय उपलब्ध होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:00 PM 30/Nov/2024













