लाडकी बहीण योजना नाही, ‘ती’ ७६ लाख मते महायुतीच्या विजयाची शिल्पकार : संजय राऊत

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून अनेक दिवस उलटून गेले असले तरी अद्याप महायुतीने सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडल्याने आता भाजपाचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जात असले, तरी तशी घोषणा करण्यात आलेली नाही. एकनाथ शिंदे आणि भाजपामध्ये खातेवाटपावरून मतभेद असल्यामुळे सत्तास्थापनेचा मुहूर्त पुढे जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर आरोप करताना मोठा दावा केला आहे.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सपाटून पराभव झाला. महाविकास आघाडीतील अनेक उमेदवारांनी पराभवाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडले. तर अनेक उमेदवारांनी पैसे भरून फेरमतमोजणीची मागणी केली आहे. एकीकडे विरोधक ईव्हीएमविरोधात आक्रमक होत असून, दुसरीकडे मोठा जनाधार मिळूनही महायुती सत्तास्थापनेसाठी करत असलेला उशीर राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. संजय राऊत यांनी यावरून टीकास्त्र सोडले आहे.

लाडकी बहीण योजना नाही, ‘ती’ ७६ लाख मते महायुतीच्या विजयाची शिल्पकार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात जगभरातून संशय व्यक्त केला जात आहे. कारण निकालात दिसलेली ७६ लाख मते वाढली कशी? ती आली कुठून असे प्रश्न सर्वांना पडले आहेत. रात्री ११.३० वाजेपर्यंत हे मतदान चालू होते, असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. परंतु, राज्याच्या कुठल्या भागात रात्री मतदान सुरू होते? अशाच पद्धतीने हरयाणात १४ लाख मते वाढली आहेत. महाराष्ट्रात रात्री ११.३० वाजेपर्यंत ७६ लाख मते वाढली. त्यांचा हिशेब काही लागत नाही. ती ७६ लाख मतं महायुती नावाच्या या गोष्टीच्या विजयाची शिल्पकार ठरली आहेत. हे लाडकी बहीण योजना वगैरे यात काही तथ्य नाही, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला.

दरम्यान, काळजीवाहू मुख्यमंत्री नाराज होऊन आपल्या गावी गेले आहेत. नेमके अमावस्येच्या दिवशी ते गावी गेले आहेत. अनेकदा अमावस्येच्या दिवशी ते गावी का जातात ते मला कळत नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार की आणखी कोणी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार हे जाणून घेण्याची महाराष्ट्र वाट पाहत आहे. मुख्यमंत्रीपदाची घोषणा कधी होणार? फडणवीसांचे नाव समोर येणार की आणखी कोणाच्या नावाची घोषणा होणार? असे प्रश्न लोकांना पडले आहेत, असे सांगत संजय राऊतांनी टीकास्त्र सोडले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:32 30-11-2024